Madhuri Dixit on Aishwarya Rai Cannes look trolling : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच ‘माँ बहन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या ४ जून रोजी माधुरीचा नवा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज होणार असून यामध्ये तृप्ती डिमरी आणि धारणा दुर्गा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीमध्ये माधुरीने बॉलीवूडचे अनुभव आणि आठवणी सांगितल्या आहेत. तसेच ऐश्वर्या रायच्या अभिनयाचे विशेष कौतुक करत ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’दरम्यान झालेल्या ट्रोलिंगवरही माधुरी दीक्षितने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय दोन दशकांपासून ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होत आहे. ऐश्वर्याने तिच्या अदा, सौंदर्य आणि खास स्टाईलने कान्सचे रेड कार्पेट गाजवले आहे. यावेळीदेखील कान्स फेस्टिव्हलच्या क्लोझिंग सेरिमनीमध्ये ती सहभागी झाली होती. निळ्या रंगाच्या डिझानर गाऊनमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य आणखी खुलले होते. मात्र, सोशल मीडियावर ऐश्वर्याला तिच्या वजनावरून आणि वयावरून ट्रोल करण्यात आले. ऐश्वर्या रायच्या या ट्रोलिंगवर अभिनेत्री माधुरी दीक्षितने प्रतिक्रिया दिली आहे. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये माधुरीने ऐश्वर्या रायच्या कान्समधील लूकचे कौतुक केले आणि ऐश्वर्या एक ग्लोबल स्टार असल्याचे नमूद केले.
वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना माधुरीचे सडेतोड उत्तर
ऐश्वर्या रायला वजनावरून ट्रोल करण्यात आले होते, याबाबत माधुरी दीक्षितला विचारण्यात आले. यावर माधुरी म्हणाली, “ऐश्वर्या रायने एक समृद्ध वारसा निर्माण केला आहे. मागील २० वर्षांपेक्षा अधिकवेळा ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. ‘मिस वर्ल्ड’ म्हणून तिने अनेक देशांमध्ये काम केले आहे. ऐश्वर्या राय ही एक ग्लोबल स्टार आहे. ती आपल्या देशाचा अभिमान आहे,” असे माधुरी दीक्षित म्हणाली आहे. तसेच वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना माधुरीने सडेतोड उत्तर दिले. ऐश्वर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप काम केले आहे आणि वजनावरून तिचे महत्त्व ठरू शकत नाही, अशी भूमिका माधुरी दीक्षितने घेतली आहे.
माधुरी दीक्षित म्हणाली की, ऐश्वर्याचे वजन, तिच्या कपड्यांची साईज कोणती आहे हे तिचे मनोरंजन सृष्टीतील योगदान आणि महत्त्व ठरवू शकत नाही. यावरून तिला कमी लेखू नका. ती आधीही सुंदर होती आणि आजही सुंदर आहे. ऐश्वर्या फक्त दिसण्यासाठी नाही तर ती मनानेही सुंदर व्यक्ती आहे. मी तिच्यासह काम केले आहे आणि ती एक प्रभावी व्यक्ती असल्याचे माधुरी दीक्षित सांगितले आहे.
सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर माधुरी म्हणाली, “अशा पद्धतीने ट्रोल करणाऱ्यांना हे लक्षात आले पाहिजे की, आपण पुढच्या पिढीला काय संदेश देत आहोत. तुमचे योगदान हे तुमच्या कामामुळे नाही तर दिसण्यावरून किंवा वजनावरून ठरवले जाते, असा चुकीचा संदेश आपण तरुण पिढीला देत आहोत; त्यामुळे असे ट्रोलिंग थांबवले पाहिजे,” असे स्पष्ट मत अभिनेत्री माधुरी दीक्षितने व्यक्त केले आहे.
