Madhuri Dixit on working with Anil Kapoor : बॉलीवूडची धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा ‘माँ बहन’ चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला सिनेविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये अभिनेता अनिल कपूर यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. एकेकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारी माधुरी आणि अनिल यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र दिसल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित पडद्यावर झळकणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्याबाबत माधुरी दीक्षितने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट भूमिका मांडली आहे.

माधुरी दीक्षित व अनिल कपूर एकत्र काम करणार का?

अभिनेत्री माधुरी दीक्षित अनिल कपूर हे एकत्र स्क्रीनिंगमध्ये झळकल्यामुळे ते पुन्हा एकदा एकत्र काम करणार का याची चर्चा सुरू झाली आहे. माधुरी दीक्षितला तिने फिल्मफेअरला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिल कपूरसह काम करण्याबाबत विचारण्यात आले. त्यावर तिने स्पष्ट शब्दांमध्ये तिची भूमिका सांगितली आहे. अनिल कपूरसह एकत्र चित्रपट करण्यासाठी योग्य चित्रपट आणि कथा असणे गरजेचे आहे. यापूर्वी सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे तोच वारसा पुढे तसाच राखला गेला पाहिजे, असे माधुरीने नमूद केले.

चित्रपटाची गोष्ट चांगली असणे तितकेचे महत्त्वाचे – माधुरी

माधुरी दीक्षित म्हणाली की, अनिल आणि मला अजूनही एकत्र काम करायला आवडेल; पण त्यासाठी चित्रपटाची गोष्ट चांगली असणे तितकेच महत्त्वाचे आहे. ती कथा अतिशय उत्तमरीत्या मांडलेली पाहिजे. त्याचे कारण म्हणजे यापूर्वी आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या असून, त्या प्रचंड गाजल्या आहेत. त्यामुळे यापुढे जर एकत्र काम करण्याची वेळ आली, तर चित्रपट आणि त्याची गोष्ट तितकीच चांगली असणे गरजेचे असल्याचे मत माधुरी दीक्षितने व्यक्त केले आहे.

पूर्वीपेक्षा आता सोई-सुविधा जास्त

पुन्हा एकदा स्क्रीन शेअर केली, तर काही जुन्या काही गोष्टींची उणीव भासेल का? याबाबत विचारण्यात आले. त्यावर माधुरी दीक्षित म्हणाली की, तसे काही नाही. कलाकारांसाठी अनेक गोष्टी आता जास्त सुधारल्या आहेत. पूर्वीपेक्षा आता जास्त सोई-सुविधा मिळत आहेत. आता प्रत्येकाला व्हॅनिटी व्हॅन आहे. शूटिंगच्या वेळी अनेक लोक एकत्र काम करत आहेत. डिजिटलसह अनेक टीम उपलब्ध आहेत. स्क्रिप्ट, डायलॉग्ज सगळे तयार मिळत आहे, एका कलाकाराला अजून काय पाहिजे, असे अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाली.

बॉलीवूडच्या सुपरहिट जोडीने गाजवले बॉक्स ऑफिस

अभिनेत्री माधुरी दीक्षित व अनिल कपूर यांच्या सुपरहिट जोडीने ८० व ९० चे दशक गाजवले आहे. ‘तेजाब’, ‘राम लखन’ व ‘बेटा’ या चित्रपटांमुळे माधुरी व अनिलची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘एक दो तीन’, ‘धक धक करने लगा’ यांसारखी गाणी आजही चाहत्यांमध्ये तितकीच लोकप्रिय आहेत. माधुरी दीक्षित व अनिल कपूर यांनी ‘परिंदा’, ‘किशन कन्हैया’, ‘बेटा जमाई राजा’, ‘पुकार’ व ‘लज्जा’ या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली होती. त्यांसह २०१९ साली रिलीज झालेल्या ‘टोटल धमाल’ या चित्रपटामध्येदेखील माधुरी दीक्षित व अनिल कपूर यांनी एकत्र काम केले होते.