माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांची जोडी कायमच चर्चेत असते. या दोघांकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. धकधक गर्लची क्रेझ, तिचा डान्स, तिचं सुंदर हास्य याची आजही सर्वत्र चर्चा होत असते. माधुरीने यशाच्या शिखरावर असताना डॉ. नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांचा लग्नसोहळा १७ ऑक्टोबर १९९९ रोजी अमेरिकेत पार पडला. लग्नानंतर माधुरी सुद्धा पतीसह परदेशात राहायला गेली. पण, तुम्हाला माहितीये का? डॉ. नेनेंना माधुरी बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे याबद्दल सुरुवातीला काहीच कल्पना नव्हती. अभिनेत्रीने स्वत: हा किस्सा सांगितला आहे.

माधुरी गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘मिसेस देशपांडे’ सीरिजमुळे चर्चेत आहे. याचनिमित्ताने तिने नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने तिची अन् डॉ. नेनेंची पहिली भेट कशी झाली याबद्दल सांगितलं. अभिनेत्रीच्या भावामुळे या दोघांची पहिली भेट झाली होती.

माधुरी म्हणते, “श्रीराम यांचा जन्म लंडनमध्ये झाला आणि जेव्हा ते ७ वर्षांचे होते तेव्हा अमेरिकेत आले. ज्यावेळी त्यांना सुट्ट्या मिळायच्या तेव्हा ते त्यांच्या अन्य कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात येत होते. त्यांना कधीच चित्रपट वगैरे पाहणं या सगळ्या गोष्टींमध्ये रस नव्हता. कारण, कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना तेवढा वेळही मिळायचा नाही. राम जेव्हा भारतात यायचे तेव्हा त्यांच्या आजी-आजोबांना भेटायचे, त्यांच्या आजी-आजोबांना इंग्रजी समजायचं नाही त्यामुळे रामला त्यांच्याशी मराठीत संवाद साधावा लागायचा. यामुळेच त्यांना मराठी भाषा बोलता यायची पण, हिंदी भाषा अजिबात यायची नाही आणि समजतही नव्हती.”

Award Banner

माधुरी पुढे म्हणाली, “लग्नाच्यावेळी त्यांना फक्त मराठी बोलता यायचं हिंदी समजायचं नाही. पण, आता त्यांना हिंदी भाषाही समजते. त्यांनी कोणतेच चित्रपटही पाहिले नव्हते. मी त्यांना विचारलं होतं, ‘तुम्ही कोणता सिनेमा पाहिलाय?’ त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटाचं नाव घेतलं होतं. त्यामुळे अभिनेते म्हणून रामला फक्त अमिताभ बच्चन माहीत होते.”

“जेव्हा आमची पहिली भेट झाली तेव्हा त्यांनी विचारलं होतं…’तू काय करतेस?’ त्यावर मी सांगितलं होतं, ‘मी चित्रपटांमध्ये काम करते’ नेने यावर म्हणालेले, ‘अरे वाह छान…’ त्यांना माझी नेमकी ओळख माहिती नव्हती. मलाही ते छान वाटलं कारण, लोक जेव्हा आपल्याला चित्रपटांमुळे ओळखू लागतात तेव्हा आधीच त्यांच्या मनात आपल्याबद्दल ही अशी असेल, ही तशी असेल अशी प्रतिमा तयार होते. पण, आमच्या बाबतीत असं काहीच झालं नाही. त्यांचा स्वभाव मला पहिल्या भेटीतच खूप आवडला होता.” असं माधुरीने सांगितलं.

भावामुळे झालेली पहिली भेट

डॉ. श्रीराम नेने व माधुरीचे भाऊ अजित दीक्षित जवळचे मित्र आहेत. माधुरीच्या भावाने घरच्या पार्टीमध्ये कुणालाही न सांगता डॉ. नेनेंना त्यांच्या कुटुंबीयांसह आमंत्रित केलं होतं. याच पार्टीत माधुरी अन् डॉ. नेनेंची पहिली भेट झाली मग, पुढे आणखी भेटीगाठी वाढल्या. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन माधुरी व श्रीराम यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांच्या सुखी संसाराला नुकतीच २६ वर्षे पूर्ण झाली.

डॉ. नेने एका मुलाखतीत माधुरीबद्दल म्हणाले होते, “माझं कुटुंब आधी मुंबईत राहायचं. त्यानंतर माझे वडील कामानिमित्त बाहेरगावी आले. यामुळेच आमच्या घरी मराठी बोललं जायचं पण, मला हिंदी येत नव्हतं. कारण, आम्ही लहानपणापासून कधीच हिंदी चित्रपट कधीच पाहिले नव्हते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी UCLA ( युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस ) मध्ये होतो तेव्हा, बरेच हॉलीवूड सेलिब्रिटी माझे पेशंट होते. हॉलीवूड इंटस्ट्री खूप जास्त क्रेझी आहे हे मी स्पष्टपणे सांगतो आणि त्यामुळेच मला या क्षेत्रातील मुलीशी लग्न करायचं नव्हतं. पण, घरी लग्नाचा विचार सुरू झाल्यावर मी माधुरीच्या भावाला भेटलो. त्याचा साधेपणा, त्याची मानसिकता सगळं काही आमच्या कुटुंबाला साजेसं होतं आणि म्हणूनच मी माधुरीला भेटायला तयार झालो…आणि त्यानंतरच मी पहिल्यांदा तिचं नाव गुगल केलं, ती नेमकी कोण आहे याबद्दल जाणून घेतलं.”