माधुरी दीक्षित सध्या ‘कौन होणार करोडपती’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. १२ ऑक्टोबरपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामधून पहिल्यांदाच माधुरी सूत्रसंचालन करताना दिसत आहे. अशातच या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिच्या ‘हम आपके है कोण’ चित्रपटातील सहकलाकार आणि लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे व प्रिया बेर्डे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांचा एकत्रित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या तिघींनी १९९४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. माधुरीने निशा ही मुख्य अभिनेत्रीची, रेणुका यांनी तिची मोठी बहीण पुजाची तर प्रिया यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या चमेलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट, त्यातील संवाद, गाणी आणि पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत आणि आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. त्यामुळे या तिघींनी अनेक वर्षांनंतर रियुनियन झाल्यानंतर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
‘सोनी मराठी’वरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या ग्रँड प्रिमियरला या तिघींनी एकत्र हजेरी लावली होती. तिघींनीही साडी नेसत पारंपरिक अंदाजात एकत्र हजेरी लावली. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम काल १२ ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. हा कार्यक्रम प्रेक्षकांना दररोज रात्री ९ वाजता ‘सोनी मराठी’ व सोनी लिव अॅपवर पाहता येईल.
‘कोण होणार करोडपती’च्या पहिल्या भागात लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेने हजेरी लावली. पहिल्याच भागात बॉलीवूडमध्ये आपल्या अभियाची छाप सोडणारे दोन मराठी चेहरे एकत्रित आल्याने हा पहिला भाग पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. शिवाय माधुरी या मार्फत पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमातून झळकत आहे. त्यामुळे आता येत्या भागात माधुरी व स्पर्धकांमधील संवाद पाहणंही रंजक ठरेल.
दरम्यान, ‘हम आपके है कौन’ चित्रपटात माधुरी व रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांच्यासह दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेही झळकले होते. त्या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही अनेकांच्या पसंती पडते. तर आजही या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
