माधुरी दीक्षित १९८० आणि ९० च्या दशकात बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न भारत सोडला. ती १९९९ साली अमेरिकेला निघून गेली. माधुरी प्रसिद्धी आणि ग्लॅमर विश्वापासून दूर डेन्व्हरमध्ये स्थायिक झाली. अमेरिकेला जाण्याचा निर्णय, तिची मुलं अरिन आणि रायन यांच्याबद्दल माधुरीने सांगितलं. तसेच तिची मुलं चित्रपटसृष्टीला ‘सर्कस’ म्हणतात, असं ती म्हणाली.
मिड-डेच्या मुलाखतीत माधुरीला अमेरिकेतील तिच्या आयुष्याबद्दल विचारण्यात आलं. कारण भारताची आघाडीची अभिनेत्री अमेरिकेतील एका लहान शहरात, सुरक्षेशिवाय राहत होती. ती कोण आहे हे तिच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना माहित नव्हतं. “प्रत्येकाची आपल्या आयुष्याबद्दल काही स्वप्ने असतात आणि हे आयुष्य माझ्या स्वप्नाचा एक मोठा भाग होतं. कारण मी नेहमी विचार करायचे, मी लग्न करेन, माझे स्वतःचे घर असेल आणि मुलं असतील. त्यामुळे, जेव्हा या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या, तेव्हा त्या स्वप्नासारखे होत्या. मला डॉ. नेने आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून हवे होते, म्हणून मी लग्न केले आणि अमेरिकेत राहायला गेले. माझे भावंडं तिथे खूप पूर्वीपासून राहत आहेत, त्यांना मी भेटत होते,” असं माधुरी दीक्षितने सांगितलं.
मुलांबरोबर वेळ घालवायची माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षित पुढे म्हणाली, “अमेरिकेतील आयुष्य कसे असते हे मला माहीत होतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला कराव्या लागतात. पण ते माझ्यासाठी शॉकिंग नव्हतं. उलट मला मिळालेल्या त्या शांत वेळेचा मी आनंद घेतला. माझी स्वतःची कामं करणं, माझ्या मुलांबरोबर वेळ घालवणं, कोणी ओळखायचं नाही त्यामुळे मुलांना बागेत नेणं, त्यांच्याबरोबर मज्जा करणं, त्यांना स्कीइंगसाठी आणि इतर ॲक्टिव्हिटीजसाठी घेऊन जाणं या सगळ्या गोष्टी मी स्वतः करायचे.”
माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं काय करतात?
माधुरी दीक्षितने आपल्या मुलांच्या करिअरमधील आवडीनिवडींबद्दलही सांगितलं. तिचा धाकटा मुलगा रायन याला विज्ञान आणि STEM मध्ये (Science, Technology, Engineering, Mathematics) रस आहे. तर तिचा थोरला मुलगा अरिनला संगीताची आवड आहे. “माझा धाकटा मुलगा यूएससीमध्ये कॉलेजमध्ये शिकतोय आणि मोठा मुलगा याच वर्षी मे महिन्यात ग्रॅज्युएट झाला. तो ॲपलमध्ये काम करतोय. मोठ्याला कदाचित चित्रपटांमध्ये काम करण्याची थोडी इच्छा होती, पण त्याची खरी आवड संगीत आहे, असं मला वाटतं. त्यामुळे तो स्वतःचे संगीत तयार करतो. शाळेत असतानाही त्याने संगीत हा मायनर विषय आणि सीएस इंजिनिअरिंग हा मेजर विषय म्हणून निवडला होता. धाकट्याला तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग आणि गणिताची आवड आहे. तो खूप हुशार आहे,” असं माधुरी दीक्षितने नमूद केलं.
मुलांना बॉलीवूडच्या सर्कसमध्ये रस नाही – माधुरी दीक्षित
जाणीवपूर्वक मुलांना फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून दूर ठेवलंस का? असं विचारल्यावर माधुरी म्हणाली, “मी त्यांना धूर ठेवलं नाही. त्यांना जिथे माझ्याबरोबर यावं वाटतं, तिथे मी नेते. त्यांना यायचं नव्हतं, त्या निर्णयाचा मी आदर केला. आम्ही अमेरिकेतून भारतात आलो तेव्हा मोठा ८ आणि धाकटा ६ वर्षांचा होता. माझी मुलं वेगळी आहेत. माझ्या धाकट्याला तर बॉलीवूडच्या सर्कसमध्ये काहीच रस नाही. तो यापासून पूर्णपणे अलिप्त आहे. कारण आता तुम्ही कुठेही बाहेर पडलात तरी तो एक प्रकारे गोंधळच असतो. माझा मोठा मुलगा अधिक मोकळ्या स्वभावाचा आहे, पण त्या दोघांनाही कधीच या इंडस्ट्रीमध्ये रस नव्हता.”
माधुरीने सांगितलं की तिचा मोठा मुलगा ॲपलमध्ये काम करतो. तिथे नॉइज कॅन्सलेशनशी संबंधित प्रकल्पांवर काम करतोय. माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिची मिसेस देशपांडे ही सीरिज रिलीज झाली आहे.
