Madhuri Dixit : बॉलीवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित ही तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेमध्ये आली आहे. माधुरी दीक्षितचा ‘माँ बहन’ चित्रपट येत्या ४ जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. दरम्यान, माधुरीच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘देवदास’ चित्रपटाचे नाव हमखास येते. ‘देवदास’मधील माधुरीचे सौंदर्य, अदाकारी, अभिनय आणि नृत्य प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरले होते. माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रायवर चित्रीत झालेले ‘डोला रे डोला’ गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्याच्या शूटिंगवेळी माधुरी दीक्षित चार महिन्यांची प्रेन्गेंट असल्याचा दावा केला जात होता. आता यावर माधुरी दीक्षितने स्वतः खुलासा केला आहे.
काही दिवसांपूर्वी रुबीना खानने अभिनेत्री माधुरी दीक्षित संदर्भात वक्तव्य केले होते. दिवंगत लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्या असिस्टेंट असलेल्या रुबीना खानने माधुरी दीक्षित या ‘डोला रे डोला’ गाण्याच्या शूटिंगवेळी गरोदर असल्याचा दावा केला होता. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुबीनाने माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्याबद्दल अनेक वक्तव्ये केली होती. तिने असा दावा केला होता की, संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान माधुरी दीक्षित चार महिन्यांची प्रेन्गंट होती. मात्र, ‘स्क्रीन’सह संवाद साधताना अभिनेत्री माधुरी दीक्षितने ‘देवदास’ चित्रपटावेळी ती गरोदर नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तुम्ही स्वतःच हिशोब करू शकता – माधुरी
‘डोला रे डोला’ गाण्यावेळी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांबाबत माधुरीला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना माधुरी हसत म्हणाली की, आता तुम्हीच हिशोब लावा. अरिनचा जन्म २००३ मध्ये झाला, त्यामुळे तुम्ही स्वतःच हिशोब करू शकता, असे मिश्कील अंदाजात माधुरी दीक्षितने उत्तर दिले. माधुरी दीक्षितला दोन मुले आहेत. अरिन नेने आणि रायन नेने. माधुरीचा मोठा मुलगा अरिन नेने २३ वर्षांचा असून त्याचा जन्म १७ मार्च २००३ रोजी झाला, तर ‘देवदास’ १२ जुलै २००२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्यापूर्वी, २३ मे २००२ रोजी कान्स चित्रपट महोत्सवात त्याचा प्रीमियर झाला होता, यामुळे माधुरी दीक्षित ‘देवदास’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी प्रेग्नेंट नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
फक्त थकवा आला होता बाकी काही नाही – माधुरी
माधुरी दीक्षित पुढे म्हणाली की, त्यावेळी माझा शूटिंगमुळे खूप प्रवास होत होता. मी अनेकदा अमेरिका-भारत असा प्रवास करत असे. शूटिंग संपवून मी पुन्हा तिकडे जात असायचे. माझे अनेकदा शूटिंग हे रात्रीच्या वेळी होत असे. शूटिंग आणि प्रवास हे सर्व थकवा आणणारे होते, त्यामुळे माझी तब्येत खराब होती. पण गंभीर काही नव्हते, असे देखील अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितले आहे.
लग्नानंतर अमेरिकेमध्ये झाली स्थायिक
अभिनेत्री माधुरी दीक्षितने सिनेविश्वामध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर तिने १९९९ साली श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. नेने हे अमेरिकेमध्ये स्थायिक असलेले हार्ट सर्जन होते. लग्नानंतर माधुरी अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. चित्रपटांच्या शूटिंगसाठी ती भारतामध्ये प्रवास करत असे. तिच्या मुलांच्या जन्मापूर्वी तिने केलेला ‘देवदास’ हा शेवटचा चित्रपट ठरला. यानंतर तिला अरिन आणि रायन अशी दोन मुले झाली. ‘देवदास’ चित्रपटातील भूमिकेसाठी माधुरी दीक्षितचे जोरदार कौतुक झाले, मात्र यानंतर तिने कुटुंबासाठी सिनेविश्वातून ब्रेक घेतला. आता पुन्हा एकदा माधुरीने चित्रपट आणि सीरिजमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच माधुरीचा ‘माँ बहन’ ओटीटी चित्रपट रिलीज होणार आहे.
