लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या चार दशकांच्या अभिनय कारकिर्दीत केवळ अनेक हिट चित्रपटच दिले नाहीत, तर तिच्या चित्रपटांतील गाणीही सुपरहिट ठरली आहेत. ९०च्या दशकापासून आजपर्यंत तिची अनेक गाणी श्रोत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षितच्या अशाच एका गाण्याबद्दल सांगणार आहोत, जे तब्बल ३५ वर्षांपूर्वी गीतकाराने रुग्णालयात लिहिलं होतं. चला जाणून घेऊया, हे गाणं नेमकं कोणतं होतं.

९०चं दशक हिंदी सिनेमासाठी सर्वात संस्मरणीय काळ मानला जातो. विशेषतः या काळात बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. यापैकी एक गाणं अभिनेत्री माधुरी दीक्षितचंही होतं, ज्याला अलका याज्ञिक यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायलं होतं. हे गाणं माधुरीच्या ब्लॉकबस्टर ‘साजन’ चित्रपटातील असून, त्याचे बोल होते “देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार… (‘देखा है पहली बार’).

या गाण्याचे गीतकार समीर अंजान आहेत. समीर यांनी रोहित सवल यांच्या पॉडकास्टमध्ये ‘साजन’ चित्रपटातील या गाण्याच्या निर्मितीमागचा एक रंजक किस्सा सांगितला. जागरणच्या वृत्तानुसार त्यांनी सांगितलं की, “माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर रोमँटिक गाणी मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात लिहिली होती.”

गीतकारांनी सांगितला किस्सा

ते पुढे म्हणाले, “मला आजही आठवतं की मुंबईतील नानावटी रुग्णालयाच्या ICUमध्ये माझे वडील दाखल होते आणि त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनीही आशा सोडली होती. त्याचवेळी संगीतकार नदीम यांचा वारंवार फोन येत होता की, गाणं द्या. अशा परिस्थितीत मी रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत साजनचं टायटल ट्रॅक देखा है पेहली बार साजन की आंखों में प्यार हे गाणं लिहिलं.”

अशाप्रकारे समीर अंजान यांनी माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या लोकप्रिय रोमँटिक गाण्यामागचा रंजक किस्सा सांगितला. ३५ वर्षांनंतरही अजरामर आहे हे गाणं. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘साजन’ चित्रपटातील गाणी आजही आवडीने ऐकली जातात. विशेषतः ‘देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार’ हे गाणं आजही अनेकांचं आवडतं आहे. रोमँटिक गाण्यांच्या यादीत ३५ वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.