Madhuri Dixit sells commercial office: माधुरी दीक्षित काही दिवसांपूर्वीच ‘माँ बहन’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. माधुरी विविध सिनेमांतून, भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. विशेष म्हणजे, तिची प्रत्येक भूमिका वेगळी असते. अभिनेत्री कायम प्रेक्षकांची मने जिंकून घेते.

आता मात्र माधुरी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील तिचे ऑफिस विकले आहे. आता हे ऑफिस तिने कधी विकत घेतले होते, त्यावेळी त्याची किती किंमत होती आणि आता विक्रीनंतर तिला किती फायदा झाला, या सगळ्याबद्दल जाणून घेऊ…

माधुरी दीक्षितने १८ वर्षांपूर्वी विकत घेतलेली मालमत्ता

माधुरीने ही जागा १८ वर्षांपूर्वी विकत घेतली होती. CRE Matrix ने पडताळणी केलेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, माधुरीने ही मालमत्ता ४.८५ कोटींना विकली. अभिनेत्रीने १८ वर्षांपूर्वी ज्या किमतीत ही मालमत्ता खरेदी केली होती, त्याच्या तुलनेत आता तिची किंमत जवळपास नऊ पटीने वाढली आहे.

या ऑफिसचे क्षेत्रफळ १,५९४.२४ चौरस फूट आहे. यामध्ये तीन कार पार्किंगचाही समावेश आहे. ही मालमत्ता फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनीला विकण्यात आली. या व्यवहारासाठी २९.१० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली.

रजिस्ट्रेशन रेकॉर्ड्सनुसार, माधुरी दीक्षितने १४ मे २००८ ला ही मालमत्ता ५२.५० लाखाला खरेदी केले होते. आता २०२६ मध्ये हीच मालमत्ता ४.८५ कोटी रुपयांना विकल्याने या मालमत्तेच्या किमतीत तब्बल ८२४ टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजेच, खरेदीच्या मूळ किमतीच्या तुलनेत मालमत्तेची किंमत ९.२ पटींहून अधिक वाढली आहे.

माधुरी दीक्षित व पती तिचे पती श्रीराम नेने रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. मुंबईतील विविध ठिकाणी त्यांनी मालमत्तेची खरेदी विक्री केली आहे. माधुरीबरोबरच, बॉलीवूडमधील अनेक कलाकार रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

दरम्यान, माधुरी अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती विविध फोटो, पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिच्या पोस्टना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.