Madhuri Dixit shared an emotional post After Dharmendras death: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सलमान खान, शाहरुख खान यांच्यासह अनेक कलाकार धर्मेंद्र यांच्या अंतिम संस्कारासाठी पोहोचले आहेत.
अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत आहेत. अनेक कलाकारांनी इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. काजोल, करण जोहर, सचिन पिळगांवकर, रणवीर सिंग, स्वप्नील जोशी, संतोष जुवेकर, करीना कपूर खान आणि इतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचे फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची भावुक पोस्ट
आता अभिनेत्री माधुरी दीक्षितनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले, “धर्मेंद्रजी नम्रता, ऊर्जा आणि उत्तम व्यक्तीमत्व याचे उदाहरण आहेत. धरमजी तुमच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कधीही भरून निघू शकणार नाही. तुमचा वारसा हा पडद्यापलीकडचा आहे.”
“लक्षावधी लोकांच्या कौतुक आणि प्रेमात तो कायम जिवंत राहील. तुमचे काम, तुमची विनम्रता आणि नेहमी आपुलकी जपणाऱ्या तुमची वृत्तीची इंडस्ट्रीवर कायमची छाप पडली आहे. अनेक दशके आमचे मनोरंजन केल्याबद्दल, प्रेरणा दिल्याबद्दल आणि मनात एक वेगळी जागा निर्माण केल्याबद्दल थँक्यू”

पुढे माधुरीने असेही लिहिले की तुम्ही कायम स्मरणात राहाल, असे लिहित तिने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माधुरी दीक्षित आणि धर्मेंद्र यांनी काही चित्रपटांत एकत्र काम केले आहे. त्यांनी १९८८ ला ‘खतरों के खिलाडी’, १९८९ ला वर्दी, इलाका आणि १९९५ ला ‘पापी देवता’ या चित्रपटांत एकत्र काम केले आहे.
दरम्यान, धर्मेंद्र यांनी १९६० ला ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी फक्त गंभीर भूमिकाच साकारल्या असे नाही, तर त्यांनी रोमँटिक, शांत, प्रेमळ, विनोदी अशाही भूमिका साकारल्या. त्यामुळेच धर्मेंद्र यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
