Madhuri Dixit Homemade Hair Oil Recipe : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित व तिचे डॉ. श्रीराम नेने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. माधुरीचं वय आता ५८ वर्ष आहे. मात्र, या वयातही ‘धकधक गर्ल’ने तिचा फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे. याशिवाय माधुरी चाहत्यांबरोबर तिचं स्किनकेअर रूटीन सुद्धा शेअर करत असते.
माधुरीने काही महिन्यांपूर्वी ती केसांची काळजी कशी घेते, केसांसाठी कोणतं घरगुती तेल वापरते याचा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला होता. यानंतर आता बरेचजण ‘धकधक गर्ल’ने सांगितलेल्या रेसिपीनुसार हेअर ऑइल बनवतात आणि तेच केसांसाठी वापरतात. इन्फ्लुएन्ससर दिव्या गुप्ताने माधुरीने सांगितलेल्या रेसिपीनुसार हेअर ऑइल घरच्या घरी तयार केलं आहे.
माधुरी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आहे त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला जाताना तिला केस सेट करावे लागतात, मेकअप झाल्यावर केस सेट होण्यासाठी स्प्रे मारला जातो, केसांना अनेकदा आयर्निंग किंवा रिबाँडिंग केलं जातं. यामुळे केस खराब होऊ शकतात. म्हणून माधुरी केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती तेल वापरते. खोबरेल तेलात ३ घरगुती पदार्थांचा वापर करून हे तेल बनवलं जातं. हे तेल कसं तयार करायचं पाहा…
माधुरी सांगते, “अर्धी ते पाऊण वाटी खोबरेल तेल घेऊन ते आधी गरम करायचं यानंतर त्या तेलात १० ते १५ कडिपत्त्याची पानं, १ चमचा मेथीचे दाणे आणि १ मध्यम आकाराचा कांदा या तेलात कापून टाका. या तेलाला चांगली उकळी येऊ द्या. हळुहळू तेलाचा रंग बदलतो आणि प्रामुख्याने कांद्याचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा. हे तेल थंड झाल्यावर बाटलीत गाळून घ्या. दोन दिवस हे तेल तसंच राहू द्या आणि त्यानंतर या तेलाने आठवड्यातून दोनवेळा केसांना मसाज करा. २ ते ३ तासांनी केस धुवून घ्या. यामुळे नक्कीच तुमच्या केसांना सॉफ्टनेस येईल.” टीप – अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच अभिनेत्री ‘मिसेस देशपांडे’मध्ये झळकणार आहे. या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये अभिनेत्री सीरियल किलरची भूमिका साकारणार आहे.