माधुरी दीक्षितचे पती डॉ.श्रीराम नेने यांनी त्यांच्या २७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना त्यांच्या सुखी संसारामागचं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले, त्यांच्या घरी कोणा एकाला सर्व निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये तर दोघेही एकमताने विचार करतात आणि ते खऱ्या अर्थाने एकमेकांचे साथीदार कसे आहेत याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे.
डॉ.श्रीराम नेनेंनी सांगितलं सुखी संसारामागचं रहस्य
माधुरी दीक्षित मनोरंजनविश्वात पुन्हा पहिल्यासारखी सक्रिय झाली असताना, तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. त्यांचं ‘२१ डेज टू गुड हेल्थ’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. नेने यांनी ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना, लग्नाला २७ वर्षे उलटूनही त्यांचे आणि माधुरीचे विचार कसे जुळतात, याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, “माधुरी आणि मी खूप नशीबवान आहोत. आमचे विचार, खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली बऱ्याच अंशी सारखी आहे. माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती सुंदर असते, पण केवळ बाह्य सौंदर्यासाठी काही करू नका. खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीसाठी प्रयत्न करा”.
आमचं नातं जुन्या पुरुषप्रधान पद्धतीसारखं नाही – डॉ. श्रीराम नेने
डॉ. श्रीराम नेने यांनी जवळपास तीन दशकांनंतरही त्यांचं आणि माधुरी दीक्षितचं वैवाहिक आयुष्य आनंदी असण्यामागचं कारणही सांगितलं. ते म्हणाले की, दोघेही कोणत्याही परिस्थितीत शांतपणे विचार करणारे आहेत आणि त्यांच्या घरात पुरुषप्रधान पद्धतीने निर्णय घेतले जात नाहीत. ते म्हणाले, “आम्ही एकमेकांचे जोडीदार आहोत. आमचं नातं जुन्या पुरुषप्रधान पद्धतीसारखं नाही, जिथे कुटुंबाचा प्रमुख एक असतो आणि बाकीचे त्याच्यावर अवलंबून असतात. आम्ही प्रत्येक गोष्टीत एकमेकांचे भागीदार आहोत आणि एकमेकांना दिलेला हा आदर खूप महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आम्ही समान पद्धतीने वाटून घेतो. कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं सर्वांत महत्त्वाचं आहे. माधुरी आणि माझ्या स्वतःच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या आम्ही आपापल्या पद्धतीने सांभाळतो आणि एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही.”
माधुरी आणि डॉ. नेने स्वतःला फिट कसं ठेवतात, यामागे काही गुपित, फॉर्म्युला आहे, हा समज डॉ. श्रीराम नेने यांनी हसत हसत दूर केला. ते म्हणाले की, त्यांना खेळाची आवड आहे, तर माधुरी कायमच नृत्य करत आली आहे. त्यामुळे दोघांनाही फिटनेस जपण्यास मदत होते. याशिवाय, दोघेही आपल्या दिनचर्येबाबत नियमित आणि शिस्तप्रिय असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या चांगल्या आरोग्यामागे ही शिस्तही महत्त्वाची असल्याचं डॉ. नेने यांनी नमूद केलं. काही दिवसांपूर्वी १५ ऑक्टोबर रोजी माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम माधव नेने यांनी त्यांच्या लग्नाचा २७वा वाढदिवस साजरा केला.
