बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी कपल आहेत ज्यांनी लग्नानंतर परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तर काही अभिनेत्री लग्नानंतर पतीबरोबर परदेशात राहू लागल्या. त्यापैकीच एक म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीने त्यावेळी परदेशात स्थायिक असलेले डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि बरीच वर्षे ती तिथेच राहिली. मात्र २०११मध्ये दोघांनी मुलांसह कायमचं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. माधुरी अनेकदा तिच्या परदेशातील अनुभवांबद्दल बोलत असते. डॉ.नेने यांनीसुद्धा याबद्दल बोलताना त्यांचा अनुभव सांगितंला आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात राहताना त्यांना जास्त आनंद होतो का याबद्दलही सांगितलं आहे.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने अनेकदा माधुरी, कुटुंबाबद्दल बोलत असतात. ते अनेकदा वैद्यकिय सल्ले, त्या क्षेत्रातील गोष्टींबद्दलही भाष्य करत असतात. सोशल मीडियावर दोघेही खूप सक्रीय आहेत. अशातच एका मुलाखतीत श्रीराम नेने यांना अमेरिकेतील अनुभव आणि भारतात आल्यानंतरचा अनुभव याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी दोन्ही ठिकाणांची वस्तुस्थिती सांगितली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राबद्दलही सांगितलं आहे.
भारत की अमेरिका श्रीराम नेने यांना कुठे राहायला आवडतं?
रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना भारतात राहताना अमेरिकेपेक्षा जास्त आनंद होतो का असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “मी अधिक आनंदी आहे, असं मी म्हणू शकत नाही. दोन्ही ठिकाणचं आयुष्य वेगळं आहे. तिथे (अमेरिकेत) तुम्ही तुमची ओळख लपवून ठेवू शकता आणि स्वातंत्र्य मिळतं आणि बरंचसं आयुष्य स्वतःच्या बळावर घडवावं लागतं. भारतात मात्र माझी संस्कृती आहे, आपली माणसं आहेत आणि अनेक नाती जोडलेली आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणचं आयुष्य वेगळं आहे”.
हिंदी सिनेमातील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक असलेल्या माधुरी दीक्षितबरोबर लग्न झाल्याचा आपल्या आयुष्यावर झालेला परिणाम याबद्दल बोलताना ते म्हणाले, “अमेरिकेतही असंच होतं, मी तिला त्या दृष्टिकोनातून पाहत नाही. ती माझी पत्नी आणि माझी जोडीदार आहे”. श्रीराम यांनी पुढे माधुरी दीक्षितबरोबरच्या त्यांच्या लग्नाबद्दल सांगताना म्हटलं की, दोघांनीही कधीच अशी अपेक्षा केली नव्हती की त्यांचं लग्न होईल.
“आम्ही एकमेकांची काळजी घेतो. मला तिच्या भूतकाळाबद्दल कधीच काहीच माहीत नव्हतं आणि तिलाही माझ्या भूतकाळाबद्दल माहिती नव्हती. आम्ही वेगवेगळ्या जगातून आलो होतो, पण त्याच वेळी आम्ही एकाच प्रदेशातून, म्हणजेच महाराष्ट्रातून आलो आहोत आणि आमची पार्श्वभूमीही सारखी आहे. आमच्यापैकी कोणालाही असं घडेल, असं कधी वाटलं नव्हतं. हे नशिबात होतं आणि माझ्या आयुष्यात घडलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे”. श्रीराम यांनी असंही सांगितलं की, भारतात परतल्यानंतर त्यांना सर्वाधिक ज्या गोष्टीची उणीव जाणवली, त्यापैकी एक म्हणजे अलिप्त राहण्याची मुभा.
