Dr Shriram Nene’s Post For Madhuri Dixit : माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील फक्त एक उत्तम अभिनेत्री नाही तर एक उत्कृष्ट नर्तिकासुद्धा आहे. तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय गाण्यांमधून तिच्या नृत्यकौशल्याने अनेकांना भारावून टाकलं आहे. पण, फक्त प्रेक्षकच तिच्या नृत्यकौशल्याचे चाहते नाहीयेत तर तिचे पती डॉ श्रीराम नेनेसुद्धा तिच्या नृत्याचे चाहते असल्याचं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून पाहायला मिळतं.
माधुरी दीक्षितचे पती डॉ श्रीराम नेने सोशल मीडिया खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ते यामार्फत शेअर करत असतात. अशातच आता बुधवारी २९ एप्रिल रोजी असलेल्या वर्ल्ड डान्स डेच्या निमित्ताने त्यांनी पत्नीचं कौतुक करत काही फोटो शेअर केले आणि माधुरीचं कौतुक केलं आहे. यावेळी श्रीराम नेने नेमकं काय म्हणाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
श्रीराम नेनेंनी केलं माधुरी दीक्षितचं कौतुक
श्रीराम नेने यांनी या पोस्टला ‘ती फक्त माझी पत्नी नाही तर ती आयुष्यात असंच पुढे जात राहण्याचं कारण आहे. दीर्घायुष्य मोठ्या क्षणांमध्ये नसतं ते अशा छोट्या, रोजच्या क्षणांमध्ये असतं. आजचा नाच उद्याची ताकद बनतो. आजचा आनंद आपल्याला अनेक वर्षं एकत्र ठेवतो. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन वेगळाच वाटतो, जेव्हा कळतं… असंच आपण दोघं एकत्र तरुण राहतो.’ अशी कॅप्शन दिली आहे.
श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर यानिमित्ताने माधुरी दीक्षितबरोबरचे काही रोमँटिक फोटोसुद्धा शेअर केले आहेत. अनेकांनी या पोस्टखाली कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. यामुळे श्रीराम नेने यांनी त्यांचे आभार मानले आहेत. श्रीराम नेने अनेकदा पत्नीचं कौतुक करत तिच्याबरोबरचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. ते त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटोसुद्धा पोस्ट करत असतात.
माधुरी दीक्षितच्या नृत्यकौशल्याबद्दल बोलायचं झालं तर ‘तेजाब’मधील ‘एक दो तीन’, ‘बेटा’मधील ‘धक धक करने लगा’, ‘देवदास’मधील ‘मार डाला’ अशी काही गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत. यामधील तिच्या नृत्यकौशल्याचं अनेकांनी कौतुक केलं होतं.
दरम्यान, माधुरी दीक्षित अभिनेत्री आणि नर्तिका असण्यासोबतच एक निर्मातीदेखील आहे. ती मराठी चित्रपटांची निर्मिती करते, अलीकडेच अभिनेत्री ओटीटीवरील ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमुळेही चर्चेत होती. आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम करत तिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे.
