माधुरी दीक्षित बॉलिवूडमधील अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. अभिनयासह तिने तिच्या नृत्यानेही अनेकांची मनं जिंकली आहेत. तिची अनेक गाणी सुपरहिट झाली असून त्यातील तिच्या नृत्याचं आजही कौतुक होतं. पण अनेकांना माहीत नसेल की फक्त अभिनय आणि नृत्यचं नव्हे तर माधुरीला गातासुद्धा येतं. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माधुरी दीक्षितने एका पुरस्कार सोहळ्यात तिच्या गायनाने अनेकांची मनं जिंकली होती. पण हिंदी नव्हे तर माधुरीने लोकप्रिय मराठी चित्रपटातील गाणं गायलं होतं. माधुरीने नाना पाटेकरांबरोबर एकदा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यावेळी नाना पाटेकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने मस्करी करत तिच्याबरोबर गंमतीशीर संवाद साधला. त्याचदरम्यान तिने एक लोकप्रिय मराठी गाणंही गायलं होतं.
माधुरीने गायलेलं लोकप्रिय गाणं
माधुरी दीक्षितने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांच्यासमोर गाणं गायलं होतं. ते गाणं होतं ‘दिसला गं बाई दिसला’. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या व्ही.शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं ‘दिसला गं बाई दिसला’ हे गाणं गात सगळ्यांना अवाक केलं होतं. माधुरीने तिच्या गोड आवाजात हे गाणं गायल्यानंतर तिच्या शेजारी उपस्थित असलेले नाना पाटेकरही तिच्याकडे पाहतच राहिले आणि तिचं कौतुक केलं.
‘दिसला गं बाई दिसला.’ या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर ‘पिंजरा’ या लोकप्रिय चित्रपटातील या गाण्यासाठी उषा मंगेशकर यांनी आवाज दिला असून गीतकार जगदीश खेबूडकर यांनी हे गाणं लिहिलं होतं आणि राम कदम यांनी संगीतबद्ध केलं होतं. दिवंगत अभिनेते श्रीराम लागू, अभिनेत्री संध्या, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांसारखे दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट व त्यातील हे प्रसिद्ध गाणं आजही मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यातील अजून एक व्हिडीओ समोर आला असून त्यात नाना पाटेकर मिश्कील अंदाजात माधुरीबरोबर संवाद साधताना दिसले. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करत असलेला अभिनेता पुष्कर श्रोत्री नाना पाटेकर यांना “नाना काका बऱ्याच वर्षांनंतर हा दुर्मिल क्षण आम्हाला बघायला मिळत आहे काय सांगाल” असं विचारतो. त्यावर नाना पाटेकर म्हणाले, “मगाशी मी आतमध्ये तिला म्हणालो की आपल्याला भेटून २५ वर्षे होऊन गेली. आता यानिमित्ताने भेटलो. एकदा तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्फेअरचाच पुरस्कार मिळाला होता.” नाना पाटेकर पुढे माधुरीला गंमतीत म्हणाले, “तुला आठवतंय का, तुला खूप मिळाले असतील मला एकच मिळाला म्हणून आठवतंय.” माधुरी नाना पाटेकरांचं हे वाक्य ऐकल्यानंतर हसायला लागली. २५ वर्षांनंतर माधुरी दीक्षित व नाना पाटेकर या पुरस्कार सोहळ्यात भेटले होते.
