Madhuri Dixit Skin Care & Beauty Tips : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने वयाच्या ५८ व्या वर्षी देखील आपला फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून ‘मिसेस देशपांडे’ सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यानिमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या तजेलदार चेहऱ्यामागचं गुपित सांगितलं आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये माधुरी दीक्षित सांगते, “आपण कितीही स्किन केअर केलं, त्वचेची काळजी घेतली तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा… आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे. सौंदर्य हे फक्त स्किन केअर प्रोडक्टमधून मिळत नसतं…आपलं मन देखील तेवढंच सुंदर असलं पाहिते. चेहऱ्यावर विविध लोशन्स, क्रीम्स लावून आपल्याला सुंदर होता येत नाही. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. कोणाबद्दलही नकारात्मक विचार करू नये. मला लोकांशी बोलायला आवडतं, त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. मी काय आहे, कोण आहे? या गोष्टीचा मला फारसा फरक पडत नाही. या सगळ्याबरोबरच मेडिटेशन केलं पाहिजे. मी ओंकार आणि गायत्री मंत्र म्हणते.”
आयुष्यात कायम सकारात्मक राहा असा सल्ला माधुरीने तिच्या तमाम चाहत्यांना दिला आहे. याशिवाय त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल अभिनेत्रीने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं.
माधुरी दीक्षित म्हणते, “तजेलदार चेहरा हवा असल्यास सर्वात आधी हेल्दी पदार्थ खा आणि दिवसभर भरपूर पाणी प्या. आपण किती पाणी पितो…काय खातो याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असतो. मी चेहऱ्याला रोज गुलाब पाणी ( Rose Water ) लावते. स्किन केअरच्या वस्तू नेहमी चांगल्या दर्जाच्या विकत घ्या.” माधुरी नेहमी घराबाहेर पडण्याआधी चेहऱ्यावर आधी व्हिटॅमिन सी सिरम लावते. यानंतर यावर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावते. माधुरी म्हणते, “तुमची स्किन Oily असल्यास वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा आणि कोरडी त्वचा असेल तर क्रीमी मॉइश्चरायझर वापरा.”
दिवसाअखेर चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करा, रात्री झोपण्याआधी मेकअप धुवून टाकणं फार महत्त्वाचं आहे. क्लीनसिंग बामचा वापर करून चेहरा स्वच्छ करा आणि त्यानंतर नाइट मॉइश्चरायझर लावून अभिनेत्री विश्रांती घेते. दिवसभर खूप पाणी प्या, हेल्दी खा आणि ७ ते ८ तास तरी विश्रांती घ्या अशी माहिती माधुरीने तिच्या व्हिडीओमध्ये दिली आहे.
महत्त्वाची टीप : हा लेख माधुरी दीक्षितने दिलेल्या माहितीनुसार आहे. कोणत्याही वैद्यकीय स्थितीसंदर्भात अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

