धक धक गर्ल माधुरी दीक्षितने तिच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि नृत्याने आजवर अनेकांचं मनोरंजन करत प्रेक्षकांची पसंती मिळवली. माधुरी ९०च्या काळातील बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती आणि आजही तिची क्रेझ कायम आहे. पण प्रत्येकवेळी तिच्या कामासाठी तिचं कौतुकच झालं आहे असं नाही. माधुरीच्या कामावरही टीका झाली होती आणि एवढंच काय तर तिने एकदा भरपुरस्कार सोहळ्यात तिच्यावर टीका करणाऱ्या समीक्षकांना सुनावलं होतं.

माधुरी दीक्षित तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकांच्या चर्चेचा विषय राहिली आहे. आजपर्यंत अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह काम करत तिने अनेक हिट चित्रपट दिले आहे. मात्र तिला तिच्या कामासाठी समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर तिने एक पुरस्कार स्वीकारताना थेट टीकाकारांवर निषाणा साधला होता. माधुरीने फिल्मफेअरच्या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना ती तो पुरस्कार तिच्यावर टीका करणाऱ्यां समीक्षकांना समर्पित करत असल्याचं म्हटलं होतं.

फिल्मफेअरच्या ४३व्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीला ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळचा तिचा व्हिडीओ फिल्मफेअरच्या सोशल मिडिया पेजवर उपलब्ध असून सध्या हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ऐश्वर्या रायने माधुरीला हा पुरस्कार प्रदान केला होता आणि बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत माधुरीने हा पुरस्कार स्वीकारताना समीक्षकांना टोला लगावला होता.

माधुरी दीक्षितने टीकाकारांना दिलेलं सडेतोड उत्तर

अभिनेत्री पुरस्कार स्वीकारताना म्हणालेली, “मला हा पुरस्कार माझ्या तथाकथित समीक्षकांना समर्पित करायचा आहे, ज्यांना वाटत होतं की मी कदाचित माझा गाशा गुंडाळून निघून जाईन. हा पुरस्कार म्हणजे प्रेक्षकांची पसंती आहे. तुमचे खूप खूप आभार.” १९९७मध्ये आलेल्या दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा दिग्दर्शित ‘दिल तो पागल है’ चित्रपटात माधुरी दीक्षित, शाहरुख खान, करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. आजही या चित्रपटातील करिश्मा व माधुरी यांच्या कामाची तुलना केली जाते आणि आजही सोशल मीडियावर कोणी अधिक लक्ष वेधून घेतलं होतं अशी चर्चा सुरू असताना दिसते.

माधुरीसह त्यावेळी स्टेजवर ऐश्वर्या राय व अभिनेते जॅकी श्रॉफही उपस्थित असल्याचं या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. तिने तिच्या भावना व्यक्त करत पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंचावर उपस्थितांसह कार्यक्रमातील मान्यवरांनीही टाळ्या वाजवत तिचं कौतुक केल्याचं दिसतं.

दरम्यान, माधुरी दीक्षितने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग असून आजही तिने काम केलेल्या कलाकृतींना त्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. अलीकडेच अभिनेत्री ‘मां बहन’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटामुळे चर्चेत आली होती.