हॅलोविननिमित्त सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे विविध लूकमधील फोटो व्हायरल झाले. हॉलीवूड, बॉलीवूडमधील कलाकारांनी मोठ्या उत्साहाने हॅलोविनसाठी हटके असे आउटफिट परिधान केल्याचं पाहायला मिळालं. याचनिमित्ताने माधुरी दीक्षितचे पती डॉ.श्रीराम नेने यांनीही सोशल मीडियावर दोन्ही मुलांचे हॅलोविनमधील बालपणीचे फोटो असलेला व्हिडीओ शेअर केला.यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
३१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या हॅलोविनच्या दिवशी अनेक कलाकारांचे भयावह असे लूक सोशल मीडियावर पाहायला मिळाले. परंतु, श्रीराम नेनेंनी मात्र त्यांच्या मुलांचे गोड असे हॅलोविनमधील पोस्ट केले आहेत. पूर्वी अमेरिकेत राहत असताना ते हॅलोविन कशा पद्धतीने साजरा करायचे याची झलकही पाहायला मिळते. माधुरी व श्रीराम नेनेंची दोन्ही मुलं वेगवेगळ्या आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओला त्यांनी “एकेकाळी हॅलोविन म्हणजे छोटी छोटी खोडकर पात्रं, भोपळ्यांची सजावट आणि भरपूर धम्माल! काही वेशभूषा आता काळाच्या पडद्याआड गेल्या… पण त्या आठवणी आजही ताज्या आहेत.” अशी कॅप्शन दिली आहे.
या फोटोमध्ये माधुरीची दोन्ही मुलं अरिने नेने आणि रायन नेने यांनी हॅलोविनसाठी वेगवेगळ्या मजेशीर वेशभूषा केल्या होत्या. मोठ्या मुलाने थॉमस अँड फ्रेंड्समधील थॉमस ट्रेनचा पोशाख परिधान केला होता, तर दुसऱ्या मुलाने फायर फायटरचा लूक केला होता. त्याचबरोबर एका फोटोत तो स्टार वॉर्समधील डार्थ वॅडरच्या वेशभूषेतही दिसतोय. तर आणखी एका फोटोत डाल्मेशियन श्वानाच्या वेशभूषेत त्याचा गोंडस अंदाज पाहायला मिळतो. एकूणच, दोघांनीही हॅलोविनच्या निमित्ताने वेगवेगळ्या पात्रांच्या वेशभूषा करून धमाल केली होती.

दरम्यान, हॅलोविन होऊन गेलं असलं तरी अजूनही सोशल मीडियावर लोकप्रिय सेलिब्रिटीनी यानिमित्त केलेल्या लूकचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हॅलोविनच्या निमित्ताने हॉलीवूड सेलिब्रिटींनी आपल्या हटके आणि कल्पक वेशभूषांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हेडी क्लमने स्वतःच्या हाताचा भास निर्माण करणारी अतिशय वेगळी वेशभूषा केली, तर झेंडायाने अभिनेत्री हॅले बेरीच्या जुन्या लूकची हुबेहूब नक्कल केली. किम कार्दशियनने मुलगी नॉर्थ वेस्टचा लूक साकारला, तर पॅरिस हिल्टनने ‘ब्युटी अँड द बीस्ट’मधील पात्राची वेशभूषा केली. बॉलीवूडमध्येही हॅलोविनचा उत्साह पाहायला मिळाला. प्रियांका चोप्रा जोनासने पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीबरोबर हॅलोविन साजरं केलं. अभिनेत्री प्रणूतनने ‘वेडनसडे अॅडम्स’चा लूक केला. अशा विविध रूपांत सजलेल्या सेलिब्रिटींचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
