Madhuri Dixit was madly in love with Bollywood actor: पडद्यावर दिसणारे कलाकार जितके त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. त्यांच्या भूमिका जितक्या गाजतात, तितकेच त्यांच्या रिलेशनशिप, लग्न, नवरा, बायको, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, कुटुंब, मुले, घटस्फोट अशा अनेक गोष्टींची चर्चा होते.

अभिनेत्री माधुरी दीक्षित बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. तिने आजवर अनेक सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. माधुरीच्या एकापेक्षा एक भूमिका, तिचा डान्स, अभिनय यांमुळे ती बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ठरली. ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होती. लग्नानंतर तिने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला. त्यानंतर रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम केले.

आता माधुरी फक्त थिएटरमध्ये येणारे चित्रपटच नाही तर ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज व चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तिच्या या भूमिका आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळ्या आहेत.

माधुरी अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने हेही लोकप्रिय आहेत. ते त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. याबरोबरच, लग्नाआधीच्या माधुरीच्या रिलेशनशिपचीदेखील बऱ्याचदा चर्चा होताना दिसते.

माधुरी दीक्षित ‘या’ अभिनेत्याच्या होती प्रेमात

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या प्रेमात होते, ते रिलेशनशिपमध्ये होते, असे म्हटले जाते. ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लक्ष वेधून घेत होती. प्रेक्षकांची मने जिंकत होती. त्यांनी ज्या चित्रपटांत एकत्र भूमिका साकारल्या, त्यातील अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. यामध्ये खतरों के खिलाडी, थानेदार, साजन, खलनायक आणि इलाका अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. या चित्रपटांतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती.

संजय दत्तचे लग्न झाले होते. पण, तरीही अभिनेता माधुरीच्या प्रेमात पडला. जेव्हा संजय दत्तची पत्नी रीचा ब्रेन ट्युमरच्या उपचारांसाठी परदेशात गेली, तेव्हा माधुरी व संजय दत्त एकमेकांच्या अधिक जवळ आले, असे म्हटले जाते. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही.

जेव्हा रीचा भारतात परत आली, तेव्हा तिच्या वैवाहिक आयुष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या. तिने तिचे नाते वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला यश मिळाले नाही. १९९३ या वर्षात संजय दत्त व माधुरीच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या. १९९३ मध्ये, मुंबई बॉम्बस्फोटांच्या संबंधात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याबद्दल संजय दत्तला टाडा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. वृत्तांनुसार, त्याच्या अटकेनंतर माधुरी दीक्षितने स्वतःला संजयपासून दूर केले.

याशिवाय, माधुरी दीक्षितने संजयला तिच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकले. तिने त्याचे फोन घेणे बंद केले. स्टारडस्ट मॅगझिनमधील वृत्तानुसार, माधुरीने कोणाकडूनतरी एक गोष्ट सांगितली. ती अशी की, कृपया संजूला सांग की मला पुन्हा कधीही फोन करू नको. त्याला सांग की आता सगळं संपलं आहे.”

दरम्यान, आज माधुरी व संजय दत्त आजही विविध सिनेमांतून, भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. संजय दत्त नुकताच राजा शिवाजी सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.