Bharti Singh on Madhuri Dixits son: बॉलीवूडच्या कलाकारांची मुले लहानपणापासूनच चर्चेत असतात. कलाकारांप्रमाणेच त्यांच्या मुलांनादेखील लोकप्रियता मिळते. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स असतात. कलाकारांबरोबरच त्यांच्या मुलांचादेखील मोठा चाहतावर्ग असतो. अनेकदा कलाकारही त्यांच्याबद्दल बोलतात, वक्तव्ये करतात.
भारती सिंग म्हणाली….
आता लोकप्रिय कलाकार भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन व अरबाज खानचा मुलगा अरहान यांच्याबद्दल वक्तव्य केले.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारती व हर्ष यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ” ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये लाडूच्या जाहिरातीचा एक सीन होता. त्यासाठी करणसरांनी आम्हाला बोलावले होते. अनेक टीव्ही कलाकार सेटवर आले होते. माधुरीजींचा मुलगा सेटवर सहायक म्हणून काम करत होता; पण आम्हाला याची कल्पना नव्हती. एक देखणा, गोड, क्यूट मुलगा आमच्यासमोर पंखा घेऊन उभा राहिला. मी त्याला म्हणालो की, याची काही गरज नाही. तेवढ्यात करणसर आले आणि त्यांनी सांगितले की, तो माधुरी दीक्षित यांचा मुलगा आहे. ते ऐकल्यानंतर मला धक्का बसला. मी जागेवरून लगेच उठलो आणि त्याला म्हणालो की, तू इथे बस.”
यावर भारती सिंग विनोद करीत म्हणाली, “आम्ही घाबरलो होतो. मला असे सतत वाटत होते की, घरी जाऊन त्याच्या आईला आमच्याबद्दल सांगेल.”
याच मुलाखतीत भारतीने आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, “अरिनची भेट झाल्यानंतर आणखी एक मुलगा आमच्यासाठी खुर्ची घेऊन आला. नंतर समजले की, तो अरबाज खानचा मुलगा अरहान आहे. आमच्याबरोबर नेमके काय घडत आहे, हेच आम्हाला समजत नव्हते. आम्हाला वाटले की, आता आयुष्यात पुन्हा काम मिळणार नाही. अरबाज खानचा मुलगा आमच्यासाठी खुर्ची आणत होता आणि माधुरी दीक्षितचा मुलगा आमच्यासाठी पंखा घेऊन उभा होता. आमची अवस्था खूपच विचित्र झाली होती. आम्ही पटकन आमच्या सीनचे शूटिंग पूर्ण केले आणि मानधनही न घेता तिथून निघालो.”
माधुरी दीक्षित यांचा मुलगा अरिनने गेल्या वर्षी अमेरिकेतून इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. एका मुलाखतीत माधुरीने सांगितले होते की, तिच्या मुलांना चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची विशेष इच्छा नाही.
तर अरबाज खान व मलायका अरोराचा मुलगा अरहान सध्या सहायक दिग्दर्शक म्हणून काम करीत आहे. नुकतीच त्याने दम बिर्याणी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले. ही सहा भागांची मालिका त्याच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे.
