Mahakavya Shree Ramayana Katha Vanar Sena Spectacles Controversy: अभिषेक सिंह यांनी दिग्दर्शित केलेला ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ यामध्ये वानर सेनेतील एका व्यक्तीने चष्मा घातल्याचे दिसून आले. यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी सिनेमाला ट्रोल केले असून याचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी सिनेमाच्या एडिटिंगमधील अनेक चुका समोर आणल्याने आता ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ सिनेमाच्या निर्मात्यांनी याबाबत खुलासा केला आहे.
‘महाकाव्य श्री रामायण कथा’ सिनेमातील वानर सेनेतील एका व्यक्तीने चष्मा घातल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्रेतायुगामध्ये चष्मा होता का? आणि ही रामायणाची थट्टा आहे का? असे प्रश्न विचारत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता सिनेमाच्या निर्मात्यांनी यावर भूमिका मांडली आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक सिंग व निर्मात्यांनी चित्रपटामधील चष्मा असलेला सीन सिनेमामध्ये असेल तर त्याचा पुरावा द्या, असे सांगितले आहे.
फक्त प्रमोशनसाठी शेअर केलेला फोटो – निर्माते
चष्मा लावलेला फोटो फक्त पोस्टरमध्ये असून असा सीन सिनेमात नसल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. ते म्हणाले, “जर असा सीन सिनेमामध्ये दाखवण्यात आला असेल तर कृपया चित्रपटगृहात घेतलेला खरा स्क्रीनशॉट शेअर करा किंवा वानर सेनेमध्ये चष्मा लावल्याचे कोणी दिसत असेल तर तो सीन नेमका कधी आहे, ती वेळ सांगा. तेव्हाच आम्ही यावर सर्वांसमोर प्रतिक्रिया देऊ. पण फक्त प्रमोशनसाठी शेअर केलेला फोटो हा सिनेमातील सीन असल्याचा दावा करणे अत्यंत चुकीचे आहे.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो हा फक्त सिनेमाच्या ‘कॅरेक्टर-रिव्हील’ पोस्टरमध्ये आहे. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यावरुन नेटकऱ्यांनी टीका केली. यावर सिनेमाच्या निर्मात्यांनी हे फक्त प्रमोशनसाठी केलेले पोस्टर असून तो सिनेमामध्ये प्रत्यक्ष दाखवलेला सीन नाही. पोस्टर म्हणजेच सिनेमातील खरा सीन आहे, असा चुकीचा समज करुन घेऊ नये, असे मत सिनेमाच्या निर्मात्यांनी व्यक्त केले आहे. तसेच सिनेमावर प्रतिक्रिया देताना त्यावर टीका करण्यात कोणतीही हरकत नाही. पण ही टीका सिनेमात दाखवलेल्या प्रत्यक्ष सीनवर असावी, असे निर्मात्यांनी सांगितले.


यावर ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक सिंग म्हणाले, “टीका करणे हा चित्रपटनिर्मितीचाच एक भाग आहे आणि प्रत्येकाचे मत हे सारखेच असावे अशी अपेक्षा आम्ही करत नाही. पण, लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या सिनेमावरच टीका व्हायला पाहिजे. पण सिनेमातील काही सीन असल्याचे दावा करत प्रमोशनल फोटो, एडिट केलेले फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात असतील, तर चित्रपटात प्रत्यक्षात काय दाखवलं आहे, हे प्रेक्षकांसमोर आणण्याचा आम्हाला, निर्माते म्हणून, पूर्ण अधिकार आहे.”
