Mahakavya Shree Ramayana Katha Vanar Sena Spectacles Controversy: अभिषेक सिंह यांनी दिग्दर्शित केलेला ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ‘कच्चा बदाम’ गाण्यामुळे व्हायरल झालेल्या रीलस्टार अंजली अरोराने माता सीताची भूमिका साकारली. त्यामुळे हा सिनेमा आधीच चर्चेत असताना सिनेमातील सध्या एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ सिनेमामध्ये पौराणिक काळामध्ये वानर सेनेतील एकाने चष्मा घातल्याचे दिसून आले आहे.

एकीकडे रणबीर कपूर व साई पल्लवी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले असून, या सिनेमाची चर्चा आहे. तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सिनेमाचे व्हीएफएक्स आणि एडिटिंगवरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता वानर सेनेचा एक फोटो व्हायरल होत आहे. सिनेमाच्या ‘कॅरेक्टर-रिव्हील’ पोस्टरमध्ये वानर सेनेतील एकाने चष्मा घातला आहे. पौराणिक कथेवर आधारित सिनेमात चष्मा दाखवल्याने नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

सोशल मीडियावर चष्मा घातलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तुफान मीम्स तयार केले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “पीक डिटेलिंग्स बाय अंजली अरोरा.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “१० मिनिटांत चष्मा ऑनलाइन ऑर्डर केला असेल.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हा दुसरा आदिपुरुष सिनेमा आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “रामायणाच्या काळातही चष्मा होता, हे तर मला आजच कळतंय.”

‘महाकाव्य श्री रामायण कथा’ सिनेमातील व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. एकाने लिहिले, “ही तर रामायणाची थट्टा सुरू आहे, हे थांबलं पाहिजे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “त्रेता युगात चष्मा होता तरी का?” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हे सर्व मु्द्दाम करत आहात का?”

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टर

‘महाकाव्य श्री रामायण कथा’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहेत. अनेकांनी सिनेमातील त्रुटी व चूका सोशल मीडियावर दाखवून दिल्या आहेत. आता वानर सेनेमध्ये चष्मा घातलेल्या फोटो व्हायरल झाला आहे. या सिनेमाची प्रकाश महोबिया, संजय बुंदेला व मोनिका सेन यांनी निर्मिती केली असून, अभिषेक सिंह यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये अभिनेता देव शर्माने प्रभू श्रीराम, शील वर्माने लक्ष्मण तर अंजली अरोराने माता सीताची भूमिका साकारली आहे.