Mahakavya Shri Ramayana Katha Re-Release : अभिषेक सिंह यांनी दिग्दर्शित केलेला ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. देव शर्मा प्रभू रामांच्या तर अंजली अरोरा ही माता सीतेच्या भूमिकेमध्ये असलेल्या या सिनेमातील त्रुटींबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. यावर आता निर्माते प्रकाश महोबिया यांनी ‘नकारात्मक’ मार्केटिंगमुळे सिनेमाला फटका बसला असून याबाबत त्यांनी रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
वानर सेनेतील घातलेला चष्मा तसेच इतर अनेक एडिटिंगमधील चुका समोर आल्याने ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ सिनेमाला ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम झाल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रकाश महोबिया म्हणाले, “सिनेमाचे मार्केटिंग पूर्णपणे नकारात्मक झाले. आम्हाला आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधीच मिळाली नाही. ज्यांनी आमचा चित्रपट पाहिला, त्यांना तो खूप आवडला. पण, जर त्यांनी तो पाहिलाच नाही तर ते त्याबद्दल मत तरी कसे बनवणार?”
निर्मात्यांनी निगेटिव्ह मार्केटिंगचा केला आरोप
प्रकाश महोबिया यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर त्यांच्या चित्रपटाबद्दल “चुकीची माहिती” पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, याच विषयावर इतरही चित्रपट येत आहेत, ज्यात एका मोठ्या बजेटच्या चित्रपटाचा समावेश आहे. आमच्या माहितीनुसार, यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि इतर लोकांना ‘निगेटिव्ह मार्केटिंग’ (नकारात्मक प्रचार) करण्यासाठी प्रवृत्त केले गेले आहे. ते चुकीची माहिती पसरवत आहेत आणि लोकांना आमचा चित्रपट न पाहण्याचा सल्ला देत आहेत.”

यावर त्यांना थेट विचारण्यात आले की, ते नितेश तिवारी यांच्या चित्रपटाच्या निर्मात्यांवर आरोप करत आहेत का? तेव्हा ते म्हणाले, “मला नक्की माहीत नाही, पण आम्हाला तसे सांगण्यात आले आहे.”


‘महाकाव्य श्री रामायण कथा’ पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार
प्रकाश महोबिया यांनी दावा केला की, त्यांनी रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची घोषणा होण्यापूर्वीच त्यांच्या सिनेमाची घोषणा केली होती. तसेच, जेव्हा दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले, तेव्हा त्यांचा चित्रपट प्रदर्शनासाठी तयारही झाला होता. ते म्हणाले, “मी पहिल्यांदाच चित्रपट बनवला आहे आणि या क्षेत्रात मी नवीन आहे. चित्रपट बनवल्यानंतर त्याचे मार्केटिंग कसे करायचे याबद्दल मला पूर्णपणे माहीत नव्हते, तरीही आम्हाला नुकसान होण्याची भीती वाटत नाही. पण, फार कमी लोकांना सिनेमा पाहता आला याबद्दल आम्हाला वाईट वाटले, म्हणूनच आम्हाला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करायचा आहे.”
