Amruta Fadnavis Reacts Swara Bhaskar Padmaavat Jauhar Statement: संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर चर्चेत आली. सिनेमातील क्लायमॅक्स असलेल्या शेवटच्या जौहरबाबत स्वराने तिचे मत व्यक्त केले होते. मात्र, त्यावरून अनेकांनी तिच्यावर टीका करीत नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीतील ‘वूमन, लाइफ, फ्रीडम’ या कार्यक्रमात स्वरा भास्करने पद्मावत या सिनेमाबाबत भाष्य केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर चौफेर टीका करण्यात आली. या प्रकरणावर गायिका अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, महिलांसाठी त्यांचा आत्मसन्मान हा सर्वांत महत्त्वाचा असतो. तसेच सध्याचा काळ आणि पूर्वीचा काळ यांची तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
स्वरा भास्करबद्दल काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्वरा भास्करच्या जौहरबाबत केलेल्या वक्तव्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला त्यांना उत्तर द्यायचे नाही. कारण – त्यांनी त्यांचा दृष्टिकोन व मत मांडले आहे. पण, मला असे वाटते की, प्रत्येक स्त्रीसाठी तिचा आत्मसन्मान हा सर्वांत महत्त्वाचा असतो. आत्ताचा जो काळ आहे, तो खूप वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही आताच्या काळाची आणि त्या काळाची तुलना करू शकत नाही.”
पुढे त्या म्हणाल्या, “त्या काळामध्ये या प्रकारे त्यांना आपला आत्मसन्मान राखला जाऊ शकतो, असं वाटलं म्हणून त्यांनी एवढं मोठं बलिदान दिलं. तिथे कोणताच न्याय, न्यायालय किंवा पोलीस नव्हते. खिलजीच्या हाती लागण्यापेक्षा स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करणं, हे त्यांना जास्त योग्य वाटलं; पण या घटनेची आजच्या युगाशी तुलना होऊ शकत नाही. तुमच्या पाठीशी न्याय-व्यवस्था, पोलीस आणि समाज उभा आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांची तुलना होऊच शकत नाही.”
काय म्हणाली होती स्वरा भास्कर?
दिल्लीतील कार्यक्रमामध्ये स्वरा म्हणाली, “८०० स्त्रियांना जौहर करताना पाहून माझ्या मनात विचार आला की, देव ना करो; पण जर मी बलात्काराच्या प्रसंगातून वाचलेली स्त्री असते, तर या चित्रपटातून मला काय मेसेज मिळला असता? माझा आत्मसन्मान वाचवण्यासाठी मी जीव दिला नाही, तर मी भ्याड वाटले असते. ज्या समाजात बलात्काराचं प्रमाण इतकं जास्त आहे, तिथे आपण अत्याचारातून वाचलेल्या महिलांना ‘तुमचं आयुष्य संपलंय आणि तुम्ही मेला असतात, तर बरं झालं असतं’, असा मेसेज देणार का? तो सीन पाहून मला खूप राग आला होता. भविष्यात मुस्लीम शासकाकडून बलात्कार होऊ नये म्हणून पोटातल्या स्त्रीभ्रूणालाही जन्म घेण्याचा अधिकार नाही, असं आपल्याला दाखवायचंय का?”
