Devendra Fadnavis on Ramayana Movie: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आतुरतेने ‘रामायण’ चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर या चित्रपटामध्ये भारताला ऑस्कर मिळवून देण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत निर्माते नमित मल्होत्रा यांच्या नवीन ‘प्राइम वन’ स्टुडिओच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, जर या चित्रपटाला ऑस्कर मिळाला नाही तर त्यांची निराशा होईल.

गुरुवारी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये ‘प्राइम फोकस स्टुडिओ’च्या विस्ताराचा पहिला टप्पा असलेल्या ‘प्राइम वन’च्या उद्घाटनाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी नमित मल्होत्रा यांच्या संकल्पनेचं कौतुक केले आणि रणबीर कपूर, साई पल्लवी व यश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली.

…तर माझी निराशा होईल – मुख्यमंत्री फडणवीस

“जर रामायण चित्रपटाला अ‍कॅडमी अवॉर्ड मिळाला नाही, तर माझी निराशा होईल,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलंय. “रामायण हा जगातला एक अतिशय आधुनिक सिनेमा येणार आहे. ज्याच्या ट्रेलरलाच बिलियनपेक्षा जास्त हिट मिळाले आहेत. त्याचंही जवळपास सगळं काम त्यांनी याठिकाणी केलं आहे. त्यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमुळे या फॅसिलिटीत एक मोठी भर पडली आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

रामायण चित्रपटातील कलाकार

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा दोन भागांचा सिनेमा आहे. यामध्ये रणबीर कपूर प्रभू श्री रामांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर सनी देओल -हनुमान, रवी दुबे -लक्ष्मण, काजल अग्रवाल -मंदोदरी, लारा दत्ता-कैकेयी, अरुण गोविल-दशरथ, रकुल प्रीत सिंग- शूर्पणखा, शीबा चड्ढा -मंथरा आणि आदिनाथ कोठारे -भरतच्या भूमिकेत झळकणार आहे.

रामायण चित्रपटाचे बजेट

सुमारे ४,००० कोटी रुपयांचे बजेट असलेला ‘रामायण’ हा भारतातील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी, ऑस्कर विजेते संगीतकार हॅन्स झिमर आणि ए. आर. रहमान एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे लेखन नितेश तिवारी आणि श्रीधर राघवन यांनी केले आहे. ‘रामायण: भाग १’ दिवाळी २०२६ मध्ये, तर ‘भाग २’ दिवाळी २०२७ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.