शिल्पा शिरोडकर मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अलीकडेच ती ‘इंडियाज बेस्ट डानसर्स सीझन ५’मध्ये झळकलेली. यामध्ये तिने तिच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्यातील काही किस्से सांगितले आहेत. यावेळी तिने तिचा भावोजी दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्याबरोबरचा एक गमतीशीर किस्सासुद्धा सांगितला आहे.
शिल्पा शिरोडकरची बहीण आणि हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता शिरोडकरचं महेश बाबूबरोबर लग्न झाल्यानतंर महेश बाबूला मराठी येत नाही असा या दोन बहिणींचा समज होता आणि त्या दोघी अनेकदा त्याच्यासमोर मराठीत बोलायच्या जेणेकरुन त्याला कळणार नाही पण, एक दिवस जेव्हा महेश बाबूने मराठीत संवाद साधला तेव्हा त्यांना समजलं की त्याला मराठी येतं असा किस्सा शिल्पा शिरोडकरने या कार्यक्रमात सांगितला आहे.
महेश बाबूबद्दल काय म्हणाली शिल्पा शिरोडकर?
उल्लेख केलेल्या कार्यक्रमात शिल्पा शिरोडकरला कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हर्ष लिंबाचियाने विचारलं की “महेश बाबू तुमचे भावोजी आहेत. त्यांच्याबरोबरचा असा कोणता किस्सा आहे का जिथे तुम्ही आणि तुमची बहीण दोघींनी त्यांच्याबरोबर कुठला प्रँक केलाय वगैरे?” यावर शिल्पा शिरोडकर म्हणाली, “माझ्या बहिणीने महेशबरोबर लग्न केलं. तो तेलुगू भाषीक आहे जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा त्याला मराठी येत नव्हती. त्यामुळे आम्हाला जर काही बोलायचं असायचं तेव्हा आम्ही मराठीत बोलायचं.”
महेश बाबूला मराठी येतं
अभिनेत्री हा किस्सा सांगत पुढे म्हणाली, “नम्रताबरोबर लग्न झाल्यानंतरच्या काही वर्षांनंतर एकदा मी आणि नम्रता आम्ही बोलत होतो तेव्हा अचानक महेश म्हणाला अच्छा असं काय तेव्हा आम्ही आश्चर्यचकीत झालो. तेव्हा आमचं असं झालं की त्याला मराठी येते. तो म्हणाला की मला समजतं मराठी. त्यामुळे खरंतर त्याला मराठी येत होतं पण, त्याने ते आमच्यापासून लपवून ठेवलं होतं आणि तो इतका गमतीशीर किस्सा होता की मी आणि नम्रता म्हणालो की नशीब आम्ही काही विचित्र बोललो नाही.”
दरम्यान, नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर अनेकदा एकमेकींबरोबरचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. दोघी अनेकदा कौटुंबीक कार्यक्रमातील फोटो देखील शेअर करत असतात.
