महेश भट्ट अनेकदा नात राहा कपूरबद्दल बोलताना दिसतात. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची लेक राहा भविष्यात नक्कीच काहीतरी मोठं करणार असा विश्वास महेश भट यांना आहे. आई-वडील दोघेही बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार असूनही, अवघ्या तीन वर्षांच्या वयातच राहाने निर्माण केलेल्या आकर्षणामुळे ती भविष्यात त्यांनाही मागे टाकेल, असा महेश भट्ट यांचा विश्वास आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नात राहाबद्दल महेश भट म्हणाले, “ती रणबीर कपूर आणि आलियालाही मागे टाकेल. ती वेगळी आहे. तिच्यात एक वेगळीच ऊर्जा आहे. ती जेव्हा घरात येते, तेव्हा तिच्या ऊर्जेमुळे संपूर्ण घरच तिच्या भोवती फिरू लागतं. त्या काही तासांसाठी तीच प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असते,” तसेच, आपली नात राहा ही तिच्या आई-वडिलांपेक्षा त्यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्ट हिच्यासारखी अधिक दिसते, असा खुलासाही महेश भट्ट यांनी केला.
महेश भट्ट यांनी यावेळी लेक नात तिची मावशी पूजा भट्टसारखी असल्याचं वाटतं असं सांगत नातीच्या शाळेत गेल्याचा खास अनुभवही सांगितला. त्यांची पत्नी अभिनेत्री सोनी राजदान परदेशात असताने ते रणबीर कपूरची आई नितू कपूरबरोबर राहाच्या शाळेत गेले होते असं सांगितलं आहे.
महेश भट्ट यांनी सांगितला राहाबरोबरचा किस्सा
महेश भट पुढे म्हणाले, “नुकतंच मी नीतू (कपूर) यांच्याबरोबर राहाच्या शाळेत ‘ग्रँडपेरेंट्स डे’साठी गेलो होतो. त्यावेळी सोनी इस्तंबूलमध्ये होती. मी राहाचा एक हात धरला होता, तर नीतू तिचा दुसरा हात धरून चालत होत्या. तो एक अतिशय सुंदर क्षण होता. असाच क्षण मी याआधी फक्त पूजाबरोबर अनुभवला होता. पूजा लहान असताना तिच्याबरोबर चालतानाच्या आठवणी अचानक ताज्या झाल्या. जणू अचानक काळच थांबला आणि भूतकाळ वर्तमानात येऊन मिळाला. राहा ही पूजाचीच एक अधिक उत्साही आणि जिवंत प्रतिमा वाटते. शेवटी, हे एकच कुटुंब आहे”.
दरम्यान, रणबीर कपूर व आलिया भट्टसुद्धा अनेकदा त्यांची लेक राहाबद्दल मनमोकळेपणाने बोलत असतात. तिच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात कसा बदल झाला याबद्दल दोघे अनेकदा सांगत असतात. दोघे बऱ्याचदा लेकीबरोबर स्पॉटही होत असतात. त्यांच्या लेकीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.
