चाहत्यांना जसे चित्रपट आवडतात, कलाकारांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते, तसेच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे किस्से जाणून घ्यायलादेखील त्यांना आवडते. आता महेश भट्ट यांनी १९८२ साली प्रदर्शित झालेल्या अर्थ या चित्रपटामधील स्मिता पाटील(Smita Patil) आणि शबाना आझमी यांच्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. काय म्हणाले महेश भट्ट? १९८२ साली शबाना आझमी, स्मिता पाटील व कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अर्थ' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधावर आधारित होता. महेश भट्ट यांनी 'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "मी चित्रपटाची कथा स्मिताला सांगितली. तिला ती आवडली आणि तिने चित्रपटासाठी होकार दिला. निर्मात्याने मला जे पैसे दिले होते, ते मी स्मिताला देत होतो. पण, तिने आश्चर्याने यासाठी मला पैसे देणार का, असा प्रश्न विचारला. कारण- तिने कलात्मक चित्रपटात काम केले होते. त्या काळात कलात्मक चित्रपटासाठी पैसे घेतले जात नसत. महत्त्वाचे म्हणजे कलाकार सेटवर जाताना त्यांचे स्वत:चे कपडे आणि जेवण स्वत: आणत असत. त्याबरोबरच शबाना आझमी यांनीदेखील या चित्रपटासाठी मानधन घेतले नसल्याची आठवण सांगितली आहे. 'अर्थ' चित्रपटाआधी यश चोप्रा दिग्दर्शित सिलसिला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, संजीव कुमार व रेखा हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकांत होते. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपटदेखील विवाहबाह्य संबंधावर आधारित होता. हेही वाचा: कोणी धरली राजकारणाची वाट, तर कोणी गाजवतंय हिंदी मनोरंजनसृष्टी, ‘बिग बॉस मराठी’चे विजेते सध्या काय करतात? जाणून घ्या… मुलाखतीदरम्यान महेश भट्ट यांना विचारण्यात आले की, 'सिलसिला' हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना 'अर्थ' चित्रपटाची कल्पना सुचली का? त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले, "यश चोप्राने जी व्यभिचाराची संकल्पना 'सिलसिला' चित्रपटातून मांडली, त्याच्याशी मी सहमत नव्हतो. कारण- विवाहबाह्य संबंध हे ट्युलिप गार्डनमध्ये निर्माण होत नाहीत. ते लोकांच्या नजरेपासून दूर निर्माण होत असतात. त्यामध्ये अपराधीपणाची मोठी भावना असते. मी हे सगळं बोलत आहे. कारण- मी यामधून गेलो आहे", असे त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले. पुढे ते म्हणतात की, त्यावेळी माझे सलग चार चित्रपट फ्लॉप झाले होते. मार्केटला माझ्याकडून काय पाहिजे, यानुसार मी चित्रपट बनवत होतो. पण 'अर्थ' चित्रपटाच्या वेळी आतापर्यंत जगाला काय पाहिजे यानुसार चित्रपट बनवले आहेत. यावेळी मला काय पाहिजे. त्यानुसार चित्रपट बनवणार, असे मी ठरवले होते, अशी आठवण महेश भट्ट यांनी सांगितली आहे. दरम्यान, आतापर्यंत विवाह्यबाह्य संबंधावर आधारित सर्वांत उत्तम चित्रपट म्हणून अर्थ या चित्रपटाकडे आजही पाहिले जाते.