पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. तिने शाहरुख खानबरोबर ‘रईस’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण माहिरा खान बऱ्याचदा तिच्या भारतातील कामाचा अनुभव शेअर करत असते. यावरून तिच्यावर पाकिस्तानच्या एका मंत्र्याने टीका केली. ती पैशांसाठी भारतीय कलाकारांचं कौतुक करत असते, असं त्या मंत्र्याने म्हटलंय.
भांडण नाही, मतभेद नाही, तरीही गेली ३४ वर्षे पतीपासून वेगळ्या का राहतात अल्का याज्ञिक? जाणून घ्या
काय म्हणाली होती माहिरा खान
माहिरा तिच्या बॉलिवूडमधील अनुभवाबद्दल होस्ट अन्वर मकसूदशी बोलत होती. यावेळी तिला नाक ठीक करण्यास सांगितलं होतं, असा खुलासा तिने केला. मात्र, शाहरुख खानला तिचं नाक नीट वाट होतं. ती म्हणाली, “शाहरुख खान माझ्या काळातील हिरो होता आणि मी त्याच्या प्रेमात होते आणि त्याच्यासोबत काम करण्याचा विचार करायचे. हे माझे एक स्वप्न होते जे कधी पूर्ण होईल हे माहीत नव्हते. मला ती संधी मिळाली, ही खूप आनंदाची बाब होती. पण, मी जेव्हा इंडस्ट्रीत आले, तेव्हा अनेकांनी मला नाकाची सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला. पण मी म्हटलं की मी माझं नाक कापल्यास काय उरेल? मी या सल्ल्याबद्दल विचार करत होते. अशातच एकदा शाहरुख खान आणि मी एक सीन करत होतो आणि तो म्हणाला, ‘बघ, हे नाकाचे युद्ध आहे!”
“तो त्याच्या सभोवताली असलेल्या प्रत्येकाशी खूपच नम्र वागत होता. अगदी स्पॉट बॉयपासून इतर कर्मचाऱ्यांपर्यंत. त्याच्याकडून मला नम्र वागण्याची प्रेरणा मिळाली. कितीही मोठा सेलिब्रिटी असला तरी आयुष्यात नम्र असायला हवं. पाकिस्तानातही बुशरा अन्सारी सारखे कलाकार त्याच्यासारखेच आहेत,” असं माहिरा खान म्हणाली.
पाकिस्तानी मंत्र्याची माहिरावर टीका
डॉ. अफनान उल्लाह खान हे सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे नेते आहेत. तिची मुलाखत व्हायरल झाल्यानंतर लगेचच, डॉ. अफनान उल्लाह खान यांनी ट्विटरवर माहिरा खानला मानसिक रुग्ण म्हटलं. तसेच माहिरा पैशासाठी भारतीय कलाकारांची खुशामत करते, असंही म्हटलं. “माहिरा खान मानसिक रुग्ण आहे आणि होस्ट अन्वर मकसूद नशेत आहे. या दोन्ही निर्लज्जांना जनता शिव्या देत आहे. माहिरा खानच्या व्यक्तिरेखेवर पुस्तकं लिहिली जाऊ शकतात की ती भारतीय कलाकारांची पैशांसाठी खुशामत करते,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
दरम्यान, त्यांच्या या ट्वीटवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनी केलेल्या टीकेवर अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.