Mahira Khan announces second pregnancy at 41: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. ४१ वर्षीय माहिराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत याबद्दल सांगितले.

माहिरा खान ४१ व्या वर्षी होणार दुसऱ्यांदा आई

माहिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पाहायला मिळते की, तिने पांढऱ्या रंगाचा मॅटर्निटी गाऊन घातला आहे. प्रेग्नन्सीबद्दल जाहीर करत तिने लिहिले, “आपण काही प्लॅन बनवतो आणि अल्लाहचे काही प्लॅन असतात.”

२०२३ मध्ये माहिरा खानने उद्योजक सलीम करीम यांच्याशी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. आता ते लवकरच आई-बाबा होणार आहेत. माहिराचे हे दुसरे लग्न आहे. माहिराचे पहिले लग्न अली असकारी यांच्याबरोबर झाले होते. त्यांना एक मुलगा आहे.

नुकते तिने टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये (TIFF) पदार्पण केले. यावेळी तिने फेस्टिवलच्या ‘कम्युनिटी इम्पॅक्ट’ कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच, सिनेमातील योगदानासाठी तिचा सन्मानही करण्यात आला. ‘युवर मदर युवर मदर युवर मदर’ (Your Mother Your Mother Your Mother) या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी माहिराने साडी नेसली होती. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

पाकिस्तानी वृत्तसंस्था Dawn ला दिलेल्या मुलाखतीत तिने ४१ व्या वर्षी आई होण्याबद्दल वक्तव्य केले. ती म्हणाली, “यावेळी खूप वेगळी गोष्ट आहे, तसेच खूप आव्हानात्मक आहे. मागच्या वेळी जेव्हा मी प्रेग्नंट होते, त्यावेळी मी २४ वर्षांची होती. आता मी ४१ वर्षांची आहे. त्यामुळे मी पूर्णंत वेगळी स्त्री आहे. शारीरिक, भावनिकदृष्ट्या प्रत्येक दृष्टिकोनातून मी वेगळी आहे.”

आपल्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या आठवणी सांगत माहिरा म्हणाली, “वयाच्या २४ व्या वर्षी मी जेव्हा गरोदर होते, त्यावेळी मी निरागस होते. मी खूप उत्साही होते, माझी प्रकृतीही उत्तम होती आणि कदाचित पुढे काय होऊ शकतं, याचा मी फारसा विचार केला नव्हता. मी फक्त सगळं जसं घडत होतं, तसं स्वीकारत गेले. आता मला अनेक गोष्टींबद्दल माहीत आहे. तुम्हाला जितकं माहीत असतं, तितकी तुम्ही जास्त काळजी करता. प्रचंड आनंद असण्याबरोबरच भीतीही असते.”

दरम्यान, माहिरा रईस या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसली होती.