Rajeev Verma left bollywood : ‘मैंने प्यार किया’ चित्रपट अनेक कलाकारांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. सलमान खानचे पदार्पण आणि अभिनेत्री भाग्यश्रीला स्टारडम मिळवून देणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. याच चित्रपटात सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राजीव वर्मा आता पुन्हा चर्चेत आले आहेत. पडद्यावर श्रीमंत बिझनेसमनची भूमिका साकारणाऱ्या राजीव वर्मा यांनी आता ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ गावी जाऊन ते साधे आयुष्य जगत आहेत. मुंबईतील धकाधकीचे आणि ग्लॅमरचे आयुष्य सोडून त्यांनी आपल्या मूळ गावी भोपाळ येथे हॉटेल व्यवसाय सुरू केला असून, एकेकाळी रुपेरी पडदा गाजवणारे हे अभिनेते राजीव वर्मा आता सामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत.
आजही सलमान खानचे वडीव म्हणून ओळख
‘डिअर जनरेशन’ या चॅनेलसह साधलेल्या संवादामध्ये अभिनेते राजीव वर्मा यांनी त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आणि ‘मैंने प्यार किया’ चित्रपटांच्या आठवणी सांगितल्या आहेत. राजीव वर्मा यांचादेखील हा पहिलाच चित्रपट असून त्यावेळी सलमान खानला कोणी ओळखतसुद्धा नव्हते असे सांगितले आहे. राजीव वर्मा म्हणाले की, माझा हा पहिलाच चित्रपट होता. त्यापूर्वी मी आधी ‘चुनौती’ आणि ‘मुजरिम हाजिर’ या टेलिव्हिजन सीरियलमध्ये काम केले होते, त्यामुळे मला घराघरात ओळख मिळाली होती. पण, सलमान खान अगदी नवोदित कलाकार होता, त्याला कोणी ओळखत नव्हते. पण, मला आता सलमान खानचे वडील म्हणूनच ओळखले जाते. आजही लोक भेटले की तुम्ही ‘मैंने प्यार किया’ चित्रपटामध्ये सलमानचे वडील झाले होते ना असे विचारतात, असे राजीव वर्मा यांनी सांगितले.
‘मैंने प्यार किया’ चित्रपटात बहुतांश कलाकार नवोदित
पुढे ते म्हणाले की, ‘मैंने प्यार किया’ चित्रपट अनेक कलाकारांसाठी ओळख निर्माण करणारा होता. या चित्रपटातील कलाकारांसाठी ही नवी सुरुवात होती. सलमान खानचा लीडरोल म्हणून पहिलाच चित्रपट होता. भाग्यश्रीचे हे पदार्पण होते. मराठी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर रिमा लागू यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. अभिनेते अजित वाचानी यांचा पहिला चित्रपट आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. माझा हा पहिला चित्रपट होता, त्यामुळे प्रत्येकच कलाकार हा नवोदित कलाकार आणि प्रत्येकासाठी हा चित्रपट स्टारडम मिळवून देणारा ठरला, असे अभिनेते राजीव वर्मा यांनी सांगितले आहे.
दहा वर्षे नियमित नोकरी सांभाळून अभिनय
राजीव वर्मा यांनी त्यांच्या करिअरमध्ये झालेला बदल याबाबतदेखील सांगितले. चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यापूर्वी ते एका ऑफिसमध्ये काम करत होते. ऑफिसचे काम आणि अभिनय असे दोन्ही ते सांभाळत असत. अभिनय करताना कधी मोठ्या कलाकारांसह काम करू असा दृष्टिकोन नव्हता. अभिनय आणि नोकरी यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न होता. जवळपास दहा वर्षे, नियमित नोकरी सांभाळूनच अभिनय केला. १९९६ मध्येच अखेर नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःला पूर्णपणे अभिनयासाठी वाहून घेतले असल्याचे राजीव वर्मा यांनी सांगितले आहे.
अभिनय करताना समाधान मिळत नव्हते – राजीव वर्मा
‘मैंने प्यार किया’ चित्रपटाच्या यशानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर त्यांना येऊ लागल्या असल्याचे राजीव वर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मैंने प्यार किया’ चित्रपटामध्ये मी बिझनेसमनची भूमिका साकारली होती, त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच झाला. मला प्रत्येकच चित्रपटामध्ये बिझनेसमनच्या भूमिकांची ऑफर येत राहिल्या. मला वारंवार त्याच त्याच भूमिका दिल्या जात होत्या, त्यामुळे माझ्या अभिनयामध्ये एकसूरीपणा आला. मला अभिनय करताना समाधान मिळत नव्हते आणि आधीसारखा उत्साह वाटत नव्हता. अभिनयक्षेत्रामध्येही मला जॉब केल्यासारखे वाटू लागले. फक्त यामध्ये पैसे जास्त मिळत होते, एवढाच काय तो फरक राहिला होता; यामुळे गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजीव वर्मा यांनी सांगितले.
का घेतला गावी परत जाण्याचा निर्णय?
ते म्हणाले की, अभिनय करताना मन रमेनासे झाले होते आणि अनेक वर्षे गावाकडे परत जाण्याचा विचार सुरू होता. अखेर मी बॉलीवूड सोडून भोपाळला गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. गावी माझा हॉटेल व्यवसाय सुरू केला असून इथे शांत व निवांत आयुष्य जगत आहे. अभिनय करताना कुटुंबाला वेळ देता येत नव्हता. मित्रांना भेटता येत नव्हते. वैयक्तिक आयुष्य जगण्याची उणीव भासत होती. अखेर गावाला आल्यावर मानसिक समाधान मिळत आहे. व्यवसाय करताना पैसे किती मिळतात याचा विचार न करता मी आयुष्याचा आनंद, समाधान निवडले आहे. मुले मोठी झाल्याने आता पैशांची तशी गरज राहिली नाही. भोपाळमध्ये माझे छोटेसे हॉटेल आहे आणि आता मी मनाप्रमाणे नाटकांमध्ये काकरतो आणि आनंदात आयुष्य जगतो,” असेही राजीव वर्मा यांनी सांगितले. आजही मला सलमान खानचे वडील म्हणून माझ्या भूमिकेसाठी ओळखतात याचे समाधान वाटत असल्याचे अभिनेते राजीव वर्मा यांनी सांगितले आहे.
