Malaika Arora on Duck Walk: पडद्यावर दिसणारे अनेक कलाकार स्वत:चा फिटनेस जपण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी ते तज्ज्ञांच्या मदतीने विविध व्यायाम करतात, आहारात बदल करतात. शरीराला काय गरजेचे आहे, त्यानुसार ते आहार, व्यायाम आणि जीवनशैलीमध्ये बदल करतात.

अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, भाग्यश्री, अनिल कपूर, तमन्ना भाटिया, टायगर श्रॉफ, जॉन अब्राहम, सोनू सूद, सलमान खान असे अनेक कलाकार फिटनेसबद्दल वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट करतात. तसेच विविध मुलाखतींमधून त्यांच्या फिटनेसबद्दल गोष्टी शेअर करतात. या सगळ्यात आणखी एका अभिनेत्रीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ही अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा.

५२ वर्षीय मलायका तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती अनेकदा व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फिटनेसचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या चालण्याच्या पद्धतीबाबत खुलासा केला आहे.

Award Banner

“मी दररोज डक वॉक…”

कर्ली टेल्सशी संवाद साधताना मलायका अरोराने डक वॉक (duck walk) बद्दल सांगितले. ती म्हणाली, “विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका, पण माझ्या डॉक्टरांनी मला दररोज न विसरता पाय आत वळवून चालायला सांगितले आहे. १०-१५ पावलं सकाळी आणि १०-१५ पावलं रात्री असे चालण्यास सांगितले आहे. मी दररोज डक वॉक करते. यामुळे शरीराची अलाइनमेंट सुधारण्यास खूप मदत होते. लोक सहसा वाकून चालतात, असे चालण्याने त्यामध्येही सुधारणा होते.”

अभिनेत्री असेही म्हणाली, “मी पायात सतत हिल्सच्या चपला घातल्याने मला कंबरदुखीचा त्रास होत होता. डक वॉकमुळे ही समस्या कमी झाली आहे.”

किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ डॉक्टर सारंग देशपांडे यांच्याशी दी इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला. यावेळी डक वॉकबद्दल सारंग देशपांडे म्हणाले, “डक वॉक या प्रकारात पाय थोडे आत वळवले जातात आणि पावले हळूहळू व लक्ष देऊन टाकली जातात. हे थोडे विचित्र वाटू शकतं, पण यामागचा उद्देश शरीराची अलाइनमेंट पुन्हा योग्य करणे हा आहे. डक वॉक ही एक नियंत्रित चालण्याची पद्धत आहे,” असे डॉ. देशपांडे म्हणाले.

डाएटबद्दल मलायका अरोरा काय म्हणाली?

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत मलायका तिच्या डाएटबद्दल बोलली होती. ती म्हणाली होती की, माझा मुलगा खाण्यापूर्वी अन्न मोजून घेतो. पण, मी खाण्यापूर्वी अन्न मोजून घेत नाही, त्यापेक्षी मी वाटीत अन्न घेऊन खाण्याला प्राधान्य देते. ती वाटी एका विशिष्ट आकाराची असते. तितकेच अन्न मी खाते.

ती असेही म्हणालेली की मी इंटरमिटंट फास्टिंग करते. ही पद्धत माझ्यासाठी उपयुक्त ठरली आहे. माझी झोप चांगली होते, मी छान उठते. मला माझे शरीर जड वाटत नाही. मी हे आधी दररोज करत होते, आता मी इंटरमिटंट फास्टिंग एक दिवसाआड करते. १७ तास उपवास करते आणि उरलेल्या सात तासांत जेवण करते. मला जे खायचे असेल ते खाते. डाएटिंग आणि उपवास करण्यात फार फरक आहे. मी चीट डे आणि अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मी खाते, पण मी त्या मर्यादित वेळेतच खाते. त्यानंतर मी खात नाही.

याबरोबरच जेवणाच्या वेळेबद्दल अभिनेत्री म्हणालेली की, मी सूर्यास्तानंतर खात नाही. संध्याकाळी मी ७ वाजता जेवते, त्यानंतर काहीही खाल्ले जाऊ नये यासाठी प्रयत्न करते. मी लवकर उठते पण मी खात नाही. सकाळी मी तूप खाते, त्यानंतर १२ वाजता जेवण करते. मी जेवणात भात, भाजी, रोटी असं सगळं खाते. मी सर्वकाही खाते.

दरम्यान, मलायका अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते.