Malaika Arora Warrant : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान २०१२ मध्ये एका बिझनेसमनबरोबरच्या वादामुळे चर्चेत राहिला होता. इक्बाल मीर शर्मा नावाच्या एनआरआय बिझनेसमनने सैफवर मारहाणीचे आरोप केले होते. सैफने आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार त्याने दिली होती.
ही घटना घडली तेव्हा सैफबरोबर करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, तिची बहीण अमृता अरोरा व इतर काही जण होते.
मलायका अरोराविरोधात वॉरंट
या प्रकरणी सैफची पत्नी करीना कपूरची मैत्रीण अमृता अरोरा त्यांच्याकडून साक्षीदार होती. तर अमृताची बहीण मलायकादेखील या प्रकरणात साक्षीदार होती. तिला कोर्टात हजर राहायला सांगितलं होतं, पण ती हजर झाली नाही. त्यामुळे आता मलायकाविरोधात पुन्हा वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल.
कोर्टाने सर्वात आधी १५ फेब्रुवारीला मलायकाविरोधात वॉरंट जारी केले होते. मात्र ती कोर्टात हजर राहिली नाही. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा वॉरंट जारी करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी २०१२ रोजी ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली, तिथे सैफबरोबर उपस्थित असलेल्या काही लोकांपैकी मलायका एक होती. हे सर्वजण डिनरसाठी त्या हॉटेलमध्ये गेले होते.
अमृता अरोराने जबाबात काय म्हटलं होतं?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अमृता अरोराने या प्रकरणी जबाबात म्हटलं होतं की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते सर्वजण हॉटेलमध्ये चांगला वेळ घालवत होते. त्यानंतर तो बिझनेसमन तिथे आला आणि आरडाओरड करू लागला. त्यानंतर सैफने त्याची माफी मागितली. तो तिथून निघून गेला होता. पण काही वेळाने सैफ वॉशरूममध्ये गेला तेव्हा तो माणूस तिथे आला. तो सैफशी भांडू लागला. बाहेरून आवाज ऐकू येत होता. त्यानंतर तो सैफच्या खोलीत गेला आणि त्याच्यावर हल्ला केला.
हॉटेलमध्ये काय घडलं होतं?
बिझनेसमन इक्बाल मीर शर्मा यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफने त्यानंतर इक्बाल मीर शर्माला धमकावले आणि त्यांच्या नाकावर मारून नाक फोडले. सैफ आणि त्याच्या मित्रांनी आपले सासरे रमन पटेल यांनाही मारहाण केल्याचा आरोप इक्बाल यांनी केला होता. तक्रारीनंतर सैफ व इतर दोन जणांना अटक करण्यात आली होती, पण नंतर सर्वांना जामीन देण्यात आला होता. या प्रकरणाबद्दल सैफने त्याचं म्हणणं मांडलं होतं. आपल्याबरोबर असलेल्या महिलांशी गैरवर्तणूक झाली होती, त्यामुळे प्रकरण घडल्याचं सैफने म्हटलं होतं.