Malaika Arora Secret Yoga Stretches For Lower Back Pain: बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. वयाच्या ५२ व्या वर्षीही तिची असणारी शरीरयष्टी आणि तंदुरूस्त शरीरामुळे मलायका ही अनेकांनी प्रेरणादायी आहे. व्यायामाची आवड व समर्पण यामुळे तिचे चाहत्यांकडून कौतुक केले जाते. आता मलायकाने कंबरेचा त्रास होणाऱ्या महिलांसाठी खास व्यायाम सांगितला आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेली मलायका अरोरा चाहत्यांबरोबर तिची व्यायामाची पद्धत सांगत असते. तसेच योगासने आणि व्यायामासंबंधित व्हिडीओही पोस्ट करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये कंबर व नितंब यांसाठी चार योगप्रकार सांगितले आहेत.
मलायकाने करून दाखवली योगासने
मलायका अरोराने कंबर आणि नितंब (पाठीच्या खालचा भाग) यासाठी उपयुक्त असणारी चार योगासने सांगितली आहेत. जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणाऱ्या किंवा सकाळी उठल्यानंतर शरीरात जडपणा जाणवणाऱ्या लोकांसाठी हे स्ट्रेच फायदेशीर ठरू शकतात. मलायकाने हे व्यायामप्रकार करून दाखवले आहेत. पहिल्या योगा प्रकारासाठी योगामॅटवर पालथे झोपून पोटावर दाब देऊन, हळूहळू हात व पाय एकाच वेळी जमिनीपासून वर करावे. या व्यायाम प्रकारास काहीजण ‘सुपरमॅन’ व्यायामसुद्धा म्हणतात.
दुसऱ्या व्यायाम प्रकारामध्ये, एक पाय पुढे ठेवा आणि दुसरा पाय मॅटवर ठेवा. आधारासाठी एक हात जमिनीवर ठेवा आणि दुसरा हात वरच्या बाजूने वर उचला. हळूहळू छाती वर केलेल्या हाताच्या दिशेने वळवा. तर तिसऱ्या प्रकारामध्ये दोन्ही पाय जमिनीवर ठेवून स्क्वॅट्स (Squats) सारखे खाली बसा. त्यानंतर हळू-हळू एक हात आणि नंतर दुसरा हात पूर्णपणे आकाशाच्या दिशेने वर करा. यावेळी दुसऱ्या हाताचा विरुद्ध पायाला स्पर्श झालेला पाहिजे.
मलायकाने सांगितलेल्या चौथ्या पोझिशनमुळे शरीर स्ट्रेच होणार असून यामुळे कंबरेच्या भागाचा चांगला व्यायाम होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी खाली बसून दोन्ही पाय पुढे करून गुडघापासून वर करा. त्यानंतर शरीराला आधार देण्यासाठी दोन्ही हात मागे जमिनीवर टेकलेले पाहिजेत. यावेळी कंबरसुद्धा जमिनीवर टेकलेली असली पाहिजे. यानंतर शरीर सैल ठेवून, गुडघ्यांवर जोर देऊन हालचाल करा. यामुळे कंबरेचा व नितंबाचा चांगला व्यायाम होणार आहे. मलायका अरोराने अशा चार पद्धतीचा व्यायाम सुचवला आहे.
मलायकाने हा व्यायाम खास महिलांसाठी सांगितला असून तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुमच्या दैनंदिन व्यायामासाठी योगासनांचे हे ४ प्रकार सेव्ह करून ठेवा.” मलायकाने सांगितलेल्या व्यायामासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नसून तुम्ही घरच्या घरीही हे अगदी सहज करू शकता. यामुळे आखडलेली कंबर किंवा पाठ सैल होऊ शकते. दिवसभर एकाच जागी बसून काम करणाऱ्या लोकांसाठीसुद्धा मलायका अरोराने सांगितलेला व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. मात्र, कोणताही अतिरिक्त व्यायाम किंवा योगप्रकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे अधिक योग्य आणि सुरक्षित ठरेल.
