Malaika Arora Mystery Man Boyfriend : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही अजूनही तिच्या अदांमुळे आणि सौंदर्यामुळे चाहत्यांना घायाळ करते. ५२ वर्षीय मलायकाचा फिटनेस आणि तिची फिगर पाहून वय हा केवळ एक आकडा असतो हे लक्षात येते. मलायकाने अनेक वर्षे सिनेविश्वामध्ये काम केले असून तिने जबरदस्त हिट गाणी दिली आहेत. तिच्या कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे ती जास्त चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी तिच्यापेक्षा लहान असलेल्या अर्जुन कपूरसह लिव्ह इनमध्ये राहणारी मलायका आता आणखी एका ‘मिस्ट्री मॅन’सह दिसून आली आहे, यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या आयुष्यातील अपडेट शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फिरायला गेल्याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सुंदर समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून येत आहे. या फोटोतील तिचा अंदाज आणि तिचा फिटनेस चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. समुद्रकिनारी घालवलेल्या या सुट्टीचे तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र, त्यातील शेवटचा एका मुलासह असणाऱ्या फोटोने लक्ष वेधले आहे. यावरून मलायकाने नवीन बॉयफ्रेंड शोधल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
मलायका अरोराने शेअर केले ग्रीसमधील फोटो
मलायका अरोराने ग्रीसमधील सुट्टीतील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती पारंपरिक ग्रीक शैलीतील घरात गुलाबी आणि लाल रंगाच्या बिकिनीमध्ये निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर गुलाबी बिकिनीमध्ये पोझ देताना दिसते. याशिवाय तिने गडद मरून रंगाच्या हॉल्टर-नेक ड्रेसमधील काही संध्याकाळचे खास फोटोही शेअर केले आहेत. या सर्व फोटोंमध्ये तिचा स्टायलिश अंदाज आणि फिटनेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे फोटो शेअर करीत मलायकाने “माझ्या खास स्टाइलिंगसह ग्रीसमधील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सुंदर अनुभव,” अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. त्याचबरोबर हॉलीडे मूड, ग्रीसगेटअवे, ट्रॅव्हलिंगस्टाईल अशा हॅशटॅगसह सुट्टीचे हे फोटो शेअर केले. मात्र, त्यातील एका फोटोने लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये ती समुद्रामध्ये एका अनोळखी व्यक्तीबरोबर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. दोघांचा पाठीमागून फोटो काढण्यात आला असून हातामध्ये ग्लास धरल्याचे दिसून येत आहे. या फोटोमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसल्याने तो नेमका कोण आहे याची चर्चा रंगली आहे.
मलायका अरोराच्या या मिस्ट्री मॅनबाबत चाहत्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘मलायका तिच्या सिक्रेट बॉयफ्रेंडसह गेली आहे का?” तर आणखी एका नेटकऱ्याने विचारले की, ‘तो शेवटचा फोटो कोणी कोणी पाहिला…?’ मलायकाच्या या फोटोवर नेटकरी रेड हार्ट इमोजी कमेंट्स करत प्रेम व्यक्त करत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा खास अंदाज, स्टाइलिंग आणि फोटो पसंतीस उतरले आहेत.
