Malaika Arora on Sorab Bedi: बॉलीवूडची ‘छैय्या छैय्या’ गर्ल, अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाचे नाव अनेक व्यक्तींशी जोडलं गेलं. काही काळापूर्वी मलायका मॉडेल सोराब बेदीबरोबर डान्स करताना दिसली होती, त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
आता ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केलं आहे. मलायका म्हणाली, “आता मला या गोष्टींचा कंटाळा होतो. अरहान आणि मी, आम्ही दोघेही या चर्चांवर हसत असतो.”
५० वर्षीय मलायकाने पुढे सांगितलं की, या गोष्टी प्लॅन नसतात, जर काही घडायचं आहे ते घडणारच. सध्या आयुष्यात जे काही सुरू आहे, त्यात ती आनंदी आहे. पुन्हा शून्यातून सर्वकाही सुरू करण्याची तिची जिद्द तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
मलायका अरोराच्या मते, जोडीदार असणं किंवा कोणीतरी सोबत असणं या छान गोष्टी आहेत, पण तिला आता पार्टनरची गरज वाटत नाही. मलायका म्हणाली, “जर मला कोणाबरोबर राहायचं असेल, तर मी माझ्या अटींवरच राहीन.”
सोराब बेदी कोण आहे?
३१ वर्षांचा सोराब बेदी हा एक मॉडेल आणि टीव्ही सेलिब्रिटी आहे. तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून ‘MTV Splitsvilla X6’ मध्ये दिसला होता. मलायका बरोबरचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोराबने सुद्धा या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. त्यानेही मलायकाबरोबरच्या अफेअरच्या बातम्यांचे खंडन केले होते आणि ती चांगली मैत्रीण असल्याचं तिने म्हटलं होतं.
मलायका अरोराचं वैयक्तिक आयुष्य
मलायका अरोराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने १९९८ मध्ये अरबाज खानशी लग्न केलं होतं. १९ वर्षांनंतर २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना अरहान नावाचा मुलगा असून ते दोघे मिळून त्याचा सांभाळ करतात. अरबाजपासून घटस्फोट घेतल्यावर मलायका अर्जुन कपूरला डेट करू लागली. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. दुसरीकडे, अरबाज खानने शुरा खान हिच्याशी दुसरं लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी आहे.
