Malaika Arora’s fitness secret: ५२ वर्षीय मलायका अरोरा कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडिया व मुलाखतींच्या माध्यमातून फिटनेसबद्दल तसेच ती स्वत:ची कशी काळजी घेते याबद्दल सांगत असते. आता मलायकाचे एक जुने वक्तव्य चर्चेत आहे.

मलायका अरोरा डाएटबद्दल काय म्हणालेली?

अभिनेत्रीने २०१९ ला पिंकविलाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिच्या डाएटबद्दल वक्तव्य केले होते. ती म्हणालेली, “मी नाश्ता करत नाही, कारण मी उपवास करते. मी इंटरमिटंट फास्टिंग करते, त्यामुळे मी नाश्ता करत नाही. मी थेट जेवण करते.”

पुढे ती म्हणालेली, “माझ्या जेवणात डाळ, भात, भाजी, रोटी असते; जे सेंद्रिय पद्धतीने पिकलेले आहे ते जास्तीत जास्त खाण्याचा मी प्रयत्न करते. रात्रीच्या जेवणात बऱ्याचदा मी सूप घेते, मला खिचडी खूप आवडते.”

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठराविक वेळेत अन्न खाणे आणि उरलेल्या वेळात उपवास करणे होय. १६:८ या इंटरमिटंट फास्टिंग पद्धतीत १६ तास उपवास केला जातो आणि ८ तासांच्या आत पौष्टिक आहार घेतला जातो. १२ तासांच्या इंटरमिटंट फास्टिंग पद्धतीत रात्री साडेसात-आठ वाजता जेवण झाल्यावर थेट १२ तासांनी म्हणजेच दुसऱ्या दिवशी खाल्ले जाते. तसेच, ५:२ या पद्धतीत आठवड्यातील पाच दिवस नेहमीप्रमाणे खाल्ले जाते आणि २ दिवस सलग उपवास केला जातो. या दोन दिवसात ५००-६०० कॅलरीज घेण्याचा उद्देश असतो.

दरम्यान, मलायका अरोरा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती योगासने, व्यायाम याबद्दल सांगत असते. कोणती योगासने केल्यानंतर काय फायदे होतील, याबद्दलही ती चाहत्यांना माहिती देते, त्यामुळे मलायका कायम चर्चेत येते.