Malaika Arora Father Anil Mehta Funeral : अभिनेत्री मलायका अरोरा हिचे सावत्र वडील अनिल मेहता यांनी बुधवारी (११ सप्टेंबर रोजी) आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे भागात ज्या इमारतीत ते राहायचे तिथे त्यांनी उडी घेऊन आयुष्य संपवलं. अनिल मेहता यांच्या निधनाने मलायकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाच्या वडिलांवर अंत्यसंस्कार कधी आणि कुठे होतील याबाबत माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलीस मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या का केली, याचे कारण तपासत आहेत. अनिल मेहता हे ६२ वर्षांचे होते, इमारतीच्या कंपाउंडमध्ये त्यांचा मृतदेह आढळला, सध्या या प्रकरणाचा सखोल तपास चालू आहे, असं पोलिसांनी सांगितलं होतं. दरम्यान, आज गुरुवारी (१२ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता सांताक्रूझ येथील हिंदू स्मशानभूमीत अनिल मेहता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
मलायका अरोराने केली पोस्ट
“आमचे प्रिय बाबा, अनिल मेहता यांचे निधन झाल्याची माहिती देताना खूप दु:ख होत आहे. ते खूप चांगले आजोबा, एक प्रेमळ पती आणि आमचे सर्वात चांगले मित्र होते. त्यांच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि या कठीण काळात आम्ही मीडिया आणि हितचिंतकांना गोपनीयतेची विनंती करतो,” असं मलायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा – वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट; म्हणाली, “आमचे प्रिय बाबा…”
मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली हे कळताच तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान सर्वात आधी त्यांच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर त्याचा भाऊ सोहेल खान, त्याचे वडील सलीम खान, आई हे सर्वजण आले होते. त्यानंतर अर्जुन कपूरही तिथे पोहोचला आणि तो दिवसभर त्यांच्यासोबत होता. ही घटना घडली तेव्हा मलायका पुण्यात होती, ती दुपारी मुंबईत पोहोचली आणि त्यानंतर बरेच बॉलीवूड सेलिब्रिटी तिचं सांत्वन करायला तिच्या घरी पोहोचले.
डिझायनर सब्यसाची आणि विक्रम फडणीस, सलमा खान, सलीम खान, अर्जुन कपूर, नेहा धुपिया, करीना कपूर खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर, किम शर्मा, सीमा सजदेह, अरहान खान, रितेश सिधवानी, अंगद बेदी, सोफी चौधरी यांच्यासह बरेच जण मलायका व तिच्या कुटुंबाची भेट घ्यायला गेले होते.