Malaika Arora Dance : ‘मुन्नी बदनाम हुई’, ‘छैय्या छैय्या’ आणि ‘अनारकली डिस्को चली’ अशा गाण्यावर मलायका अरोरानं सगळ्यांना थिरकायला भाग पाडलं आहे. बॉलीवूडमध्ये ‘आयटम गर्ल’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मलायकाने नेहमीच आपल्या स्टाइल, ग्लॅमर आणि डान्समुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या डान्सला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं असलं, तरी अनेकदा याचमुळे तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे. याबाबत मलायकानं मोकळेपणानं आपली भूमिका मांडली.
मागच्या वर्षात मलायका दोन मोठ्या म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली होती. एक हनी सिंगचं ‘चिलगम’ हे गाणं आणि दुसरं दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या ‘थम्मा’ चित्रपटातील ‘पॉइजन बेबी’ हे गाणं. या गाण्यात चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री रश्मिका मंदानासुद्धा उपस्थिती होती.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं सांगितलं की, तिला तिची ही प्रतिमा पूर्णपणे मान्य आहे आणि त्याबद्दल तिच्या मनात कसलाच संकोच नाही. ती ‘द नम्रता झकारिया शो’ या यूट्यूब कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिनं आपल्या करिअर, वैयक्तिक आयुष्य आणि चित्रपटसृष्टीतील विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
लोक ट्रोल करतात, काहीही बोलतात; पण…
या मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आलं की, आता ती आपल्या डान्स आणि आयटम साँग्समुळे झालेल्या तिच्या प्रतिमेला मनापासून स्वीकारते का? यावर मलायका म्हणाली, “नक्कीच! याबद्दल मला वाईट का वाटावं. लोक बोलतात म्हणून मी ते का कमी करावं? लोक ट्रोल करतात, काहीही बोलतात; पण मला यात इतकं चुकीचं काय आहे, हेच कळत नाही. नृत्य ही एक भावना आहे आणि त्याचा आनंद घ्यायला हवा. मी ५२ व्या वर्षीदेखील हे करू शकते, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”
हा अनुभव माझ्यासाठी खूपच सकारात्मक असल्याचंसुद्धा तिनं म्हटलं. “यामुळे मला खूप छान वाटतं. जर सर्व स्त्रियांनी याकडे एक उदाहरण म्हणून पाहिलं किंवा यामुळे त्यांना स्वतःला अधिक आत्मविश्वास मिळाला. तर माझं काम यशस्वी झालं असंच मी मानेन,” असं स्पष्ट मत मलायकानं व्यक्त केलं.
याआधी ‘टीएचआर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीतसुद्धा मलायकानं आयटम साँग्सच्या बदलत्या स्वरूपाबद्दल तिची भूमिका स्पष्ट केली होती. पूर्वी असं एखादं गाणं फक्त ग्लॅमरपुरते मर्यादित असायचं; मात्र आता दिग्दर्शक हे गाणं कथेशी आणि पात्रांशी जोडून ते सिनेमात सादर करत करतात. आयटम साँग्समध्ये आता परफॉर्मन्सही महत्त्वाचा आहे”, असं ती म्हणालेली.
मलायका अरोरा इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, मलायकानं आपल्या करिअरमध्ये अनेक गाजलेली गाणी दिली आहेत. ‘दिल से’मधील ‘छैयाँ छैयाँ’, ‘दबंग’मधील ‘मुन्नी बदनाम’, ‘हाऊसफुल २’मधील ‘अनारकली’ आणि ‘वेलकम’मधील ‘होठ रसीले’ ही तिची काही लोकप्रिय गाणी आहेत. अशातच गेल्या वर्षात तिनं केलेल्या काही डान्समुळे ती ट्रोल झाली होती.
