Malaika Arora Vegan Diet Experience: बॉलीवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोरा तिच्या आहाराच्या आणि वर्कआउटच्या सवयींमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाने व्हिगन आहाराबद्दलचा तिचा अनुभव सांगितलाय. दीर्घकाळ व्हिगन डाएट पाळणाऱ्या मलायकाने आता पुन्हा शाकाहारी व प्रोटीनयुक्त आहाराकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामागचं कारणंही तिने सांगितलं. या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या ‘किम्स हॉस्पिटल्स’च्या डाएटिशियन अमरीन शेख आणि ‘मारेन्गो आशिया हॉस्पिटल’चे डॉ. पारस अग्रवाल यांनी व्हिगन आहारातील प्रोटीन कमतरतेची लक्षणे आणि आरोग्यावरील परिणामांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, “मी कधीकधी मांसाहार करते, पण मी शाकाहारी आहे. आधी मी व्हिगन डाएट पाळत होते. पण मला आठवतंय, कोविडच्या काळात माझ्या शरीरातील प्रोटीनचं प्रमाण खूप कमी झालं होतं, त्यामुळे मी पुन्हा प्रोटीनयुक्त आहार घेण्यास सुरुवात केली. मला शाकाहारी अन्नच जास्त आवडतं.”
प्रोटीनचे स्त्रोत आणि प्रमाण महत्त्वाचे – डॉ. अमरीन शेख
व्हिगन आहाराबद्दल ठाण्याच्या ‘किम्स हॉस्पिटल्स’च्या डाएटिशियन अमरीन शेख म्हणाल्या, “डाळी, बीन्स (घेवडा/राजमा), टोफू, ड्रायफ्रूट्स आणि बिया हे प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत, पण त्यांची गुणवत्ता आणि प्रमाण वेगवेगळे असते. आहारात योग्य संतुलन नसेल तर, एखाद्या व्यक्तीचं पोट भरू शकतं पण महत्त्वाच्या पोषक घटकांची कमतरता राहू शकते. हळूहळू याचा परिणाम शरीराच्या एनर्जीवर, स्नायूंच्या ताकदीवर आणि आरोग्यावर होऊ शकतो.”
गुडगावच्या ‘मारेन्गो आशिया हॉस्पिटल’च्या ‘डायबिटीज, ओबेसिटी अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स’चे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. पारस अग्रवाल यांनी व्हिगन आहाराबद्दल महत्त्वाची माहिती दिली. व्हिगन आहारात प्राण्यांपासून मिळणारे कोणतेही पदार्थ खाता येत नाही, त्यामुळे पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. खासकरून कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२ आणि लोह यांसारखे घटक प्रामुख्याने प्राण्यांपासून मिळतात. “व्हिगन डाएटमध्ये रोजच्या गरजेनुसार प्रोटीन घेतले जात आहे की याकडे लक्ष ठेवावं लागतं. या डाएट प्लॅनसाठी न्यूट्रिशनिस्ट सल्ला घेणं आवश्यक असतं,” असं त्यांनी सांगितलं.
शरीरात प्रोटीन कमी असल्याची लक्षणे कोणती?
अमरीन शेख यांच्या मते, शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास काही लक्षणे दिसतात. “सतत थकवा जाणवणे, व्यायामानंतर स्नायूंची रिकव्हरी हळूहळू होणे, स्नायूंची ताकद कमी होणे किंवा नियमित जेवण करूनही वारंवार भूक लागणे ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असेल तर याचा अर्थ शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक पुरेसे मिळत नाहीत,” असं त्या म्हणाल्या.
एका सामान्य व्हिगन आहारात भरपूर हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, फळे, सुकामेवा आणि बियांचा समावेश असतो. “या आहारात दुग्धजन्य पदार्थांऐवजी सोया मिल्क, ओट मिल्क किंवा बदाम मिल्क वापरले जाते. या आहारासोबत योग्य फिटनेस रुटीन पाळले तर कॅन्सरचा धोका कमी होण्यास तसेच कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते,” असं डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं.
