‘राज’ चित्रपटातून रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मालिनी शर्मा सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये एक फार्मस्टे चालवत असून निसर्गरम्य आणि शांत आयुष्य जगत आहे. ग्लॅमरच्या जगापासून दूर झाल्यानंतर तिने काही काळ कॅमेऱ्यामागे काम केले आणि पुढे ‘द स्लो लोकल’ हा स्वतःचा ब्रँड सुरू केला. अचानक प्रसिद्धीपासून दूर जाण्याचं कारण तिने सांगितलं. मालिनीने मुलांचे संगोपन आणि त्यांची काळजी घेण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला होता.

‘राज’ या पहिल्याच चित्रपटातून मालिनी रातोरात स्टार बनली होती. नुकतीच ती कुठे आणि काय करते याबद्दल माहिती समोर आली आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिचीच चर्चा सुरू झाली. तिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स ६५५ वरून थेट ४५,००० हून अधिक झाले, तर तिच्या व्हिडीओजना हजारो व्ह्यूज मिळू लागले. तिच्या फार्मस्टे बुकिंगसाठी तिच्या बिझनेस नंबरवर कॉल आणि मेसेजचा पाऊस पडू लागला.

मुलांची काळजी घेण्यात व्यग्र होते – मालिनी शर्मा

मालिनी शर्माने तिच्या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. “तू चित्रपटसृष्टी का सोडलीस?” असा प्रश्न एका चाहत्याने विचारल्यावर मालिनी म्हणाली, “प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, मी गायब झाले नव्हते. मी काही काळ कॅमेऱ्यामागे काम केलं, त्यानंतर माझ्या आयुष्यात मुलं आली आणि मी त्यांच्या संगोपनात व्यग्र झाले.” दुसऱ्या एका चाहत्याने तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर परतण्याची विनंती केली तेव्हा तिने “बघुयात, नशिबात असेल तर परतेन,” असं उत्तर दिलं.

अभिनेत्री व्हायची फारशी इच्छा नव्हती – मालिनी शर्मा

    मालिनीने स्पष्ट केले की तिला कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते. ‘राज’ चित्रपट सहज मिळाला आणि ती प्रवाहाबरोबर गेली. मात्र, पहिल्याच चित्रपटानंतर मिळालेल्या अफाट प्रसिद्धीमुळे ती थोडी गोंधळली आणि तिने स्वतःला काही काळ थांबवून शांत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.

    २००० च्या दशकाच्या सुरुवातीला मालिनी शर्मा हा एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. ‘C.A.T.S.’ या टीव्ही शोमधील तिची भूमिका, ‘राज’ चित्रपट आणि ‘सावन में लग गई आग’ या प्रसिद्ध म्युझिक व्हिडीओतील कामामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्या काळात तिने अभिनेता व मॉडेल प्रियांशू चॅटर्जीशी लग्न केलं, पण त्यांचा घटस्फोट झाला. ‘एन्काउंटर’ या चित्रपटात ती झळकणार होती, पण शूटिंग सुरू होण्यापूर्वी अवघ्या दोन दिवसाआधी तिने तो चित्रपट सोडला आणि कॅमेऱ्यामागे काम करायचं ठरवलं. चित्रपटसृष्टीपासून दूर राहून तिने आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच खासगी ठेवले. “मी पठाण व्यक्तीशी लग्न केल्यामुळे अर्धी मुस्लीम आहे,” असं मालिनीने एका पोस्टमध्ये सांगितलं.

    हिंदू कुटुंबात जन्म, मुस्लीम व्यक्तीशी लग्न – मालिनी शर्मा

    मालिनीने सांगितलं की ती कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे पालन करत नाही. तिच्या धार्मिक श्रद्धेबद्दल एका चाहत्याने विचारल्यावर मालिनी म्हणाली, “माझ्या धर्माबद्दल इतरांनी का काळजी करावी? माझा जन्म हिंदू कुटुंबात झाला, मी एका मुस्लीम व्यक्तीशी लग्न केलं, पण मी कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे पालन करत नाही. मी सर्व सण साजरे करते.”