Mallika Sherawat says Tom Cruise has a crush on her : बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ४९ व्या वर्षीही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सध्या ‘द ट्रेटर्स २’ (The Traitors 2) या रिॲलिटी शोमधून पुनरागमन करणाऱ्या मल्लिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शोमध्ये कॉमेडियन कुल्लूने क्रशबद्दल विचारलेल्या प्रश्नावर एका सुपरस्टारचं नाव घेतलं. “मी खोटं बोलत नाहीये, फोन असता तर आम्ही एकत्र पार्टी करतानाचे व्हिडीओ दाखवले असते.” मल्लिकाच्या या दाव्याने नेटिझन्स आणि चाहत्यांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कुल्लूने मल्लिकाला विचारलं, “मल्लिका जी, तुमचा कधी कोणावर क्रश राहिला आहे का?” त्यावर तिने “नाही” असं उत्तर दिलं. मग कुल्लूने लगेच दुसरा प्रश्न केला, “नेहमी समोरच्याचाच तुमच्यावर क्रश असतो?” या प्रश्नावर मल्लिकाने नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने उत्तर दिलं. “सगळ्यांचाच माझ्यावर क्रश असतो,” असं मल्लिका म्हणाली.

टॉम क्रूझबरोबरचे व्हिडीओ दाखवले असते- मल्लिका शेरावत

मल्लिकाने त्यानंतर जे सांगितलं ते ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणाली, “आजकाल टॉम क्रूझचा माझ्यावर क्रश आहे. मी खोटं बोलत नाहीये. जर माझ्याकडे माझा फोन असता, तर मी तुम्हाला व्हिडीओ दाखवले असते.” त्यावर इतरांनी विचारलं, “तो तुम्हाला कसले व्हिडीओ पाठवतो?” एकाने म्हटलं, “तो नक्कीच स्नॅप्स पाठवत असेल.” त्यावर मल्लिका म्हणाली, “नाही, स्नॅप्स नाही. आम्ही एकत्र पार्टी करतानाचे आमचे व्हिडीओ मी तुम्हाला दाखवले असते.”

कोण आहे टॉम क्रूझ?

टॉम क्रूझ हा ६४ वर्षांचा हॉलीवूड अभिनेता आहे. तो जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ‘मिशन: इम्पॉसिबल, ‘टॉप गन’, ‘ईथन हंट’, ‘जॅक रीचर’, ‘द लास्ट समुराई’ आणि ‘जेरी मॅग्वायर’ हे त्याचे काही अत्यंत गाजलेले चित्रपट आहेत. त्याने आतापर्यंत तीन लग्ने केली असून त्याचे तिन्ही वेळा घटस्फोट झाले. टॉम क्रूझला तीन अपत्ये आहेत.

द ट्रेटर्स २ मधील स्पर्धक

‘द ट्रेटर्स २’ हा शो १३ ऑगस्टपासून पाहता येणाल आहे. या शोमध्ये रिया चक्रवर्ती, मुनव्वर फारुकी, श्वेता त्रिपाठी, दलीप ताहिल आणि मल्लिका शेरावत यांसारखे स्पर्धक सहभागी झाले आहेत. मल्लिका या शोमधील ‘ट्रेटर’ असू शकते असा अंदाज अनेक प्रेक्षक वर्तवत आहेत. यावर आपल्या खास शैलीत उत्तर देत ती म्हणाली, “मला ट्रेटर म्हणणं ही आता एक फॅशन झाली आहे.”

मल्लिका शेरावत सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक

मल्लिका शेरावत या शोमधील सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. नंतर तिने स्वतः या बातमीला दुजोरा दिला. ‘ई-टाइम्स’शी बोलताना मल्लिका म्हणाली, “हा अंदाज अगदी बरोबर आहे. पैसे कमावण्याबद्दल माफी कशाला मागायची? जे लोक म्हणतात की पैसे हे कारण नाही, ते खोटं बोलतात. जेव्हा तुम्ही स्वावलंबी असता, मग तुम्ही पुरुष असो वा स्त्री, पैसे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण तुम्हाला बिलं भरावी लागतात आणि तुम्हाला हवी तशी लाइफस्टाइल जगायची असते.”

मल्लिकाने यापूर्वी बरेचदा सांगितलंय की तिला खूप वेळा बिग बॉस आणि खतरों के खिलाडी शो ऑफर करण्यात आले, पण तिने नकार दिला. मात्र तिला द ट्रेटर्सचा फॉरमॅट फार आवडला, त्यामुळे तिने ही ऑफर स्वीकारली. मल्लिका शेरावत शेवटची २०२४ मध्ये आलेल्या ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात दिसली होती.