Mallika Sherawat Real Name Reveal: ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने बॉलीवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. तिचे मादक सौंदर्य आणि पडद्यावरील दमदार अभिनय यांमुळे तिने वेगळी ओळख निर्माण केली. सध्या मल्लिका सिनेविश्वामध्ये ती सक्रिय नसली तरी आजही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. मात्र, ग्लॅमरच्या दुनियेत मल्लिका शेरावत या नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीचं खरं नाव वेगळंच आहे. काय आहे मल्लिका शेरावतचं खरं नाव, जाणून घेऊया…
मल्लिका शेरावतचं खरं नाव काय आहे?
मल्लिका शेरावतने २००० च्या दशकात बॉलीवूडमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ‘मर्डर’मधील तिच्या बोल्ड लूक असो वा वेलकम’मधील तिचा खास अंदाज, मल्लिका शेरावत त्या काळातील सर्वांत चर्चेतील अभिनेत्री ठरली होती. पण मूळची हरियाणाची असलेल्या मल्लिकाचं खरं नाव रीमा लांबा, असं आहे. तसेच शेरावत हे तिचं आडनाव नसून, ते तिच्या आईचं नाव असल्याचा खुलासा अभिनेत्रीनं केला आहे.
मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मल्लिका शेरावतनं तिच्या नावाचं रहस्य उघड केलं. ती म्हणाली, “मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये नवीन आले होते, त्यावेळी रीमा नावाच्या खूप अभिनेत्री होत्या. तसेच तेव्हा मी ज्या दिग्दर्शकांबरोबर काम करीत होते, त्यांनी नाव बदलण्याचा सल्ला दिला. ‘रीमा हे नाव स्क्रीनवर चांगलं वाटणार नाही आणि त्यामुळे नावामध्ये बदल करू आणि काहीतरी ग्लॅमरस, असं नाव देऊ, असं दिग्दर्शकांनी सांगितलं होतं.’ “
पुढे ती म्हणाली, “रीमा हे नाव ग्लॅमरस वाटत नसेल, तर तुम्हाला जे वाटेल ते ठेवा, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी मल्लिका हे नाव सुचवलं. मल्लिका नाव ऐकताच मला ते आवडलं. हे नाव ऐकायलासुद्धा चांगलं वाटत होतं. म्हणून माझं नाव मल्लिका असं पडलं आणि शेरावत हे माझ्या आईचं नाव आहे.”
पुढे ती म्हणाली, “मी माझं आडनाव वापरणं सोडून दिलं. कारण- जेव्हा मी मुंबईमध्ये येऊन सिनेमांमध्ये काम करण्याचा आणि अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी माझ्या कुटुंबाकडून मला विरोध करण्यात आला. ट्रॅडिशनल कुटुंब असल्यानं त्यांनी माझं करिअर नाकारलं आणि म्हणून मी त्यांचं आडनाव नाकारून, मी माझ्या आईचं नाव वापरू लागले.”
मल्लिका शेरावतनं गाजवलेलं बॉलीवूड
मल्लिका शेरावतनं बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. पदार्पण करण्यापूर्वी ती अमिताभ बच्चन यांच्यासह ‘बीपीएल’ आणि शाहरुख खानसह ‘सॅन्ट्रो’च्या जाहिरातींमध्ये झळकली होती. त्यानंतर तिनं अभिनेता इम्रान हाश्मीबरोबर ‘मर्डर’ सिनेमामध्ये काम केल्यानंतर ती प्रचंड लोकप्रिय झाली. ‘मर्डर‘मधील त्यांची जोडी आणि बोल्ड अंदाज तरुणांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर तिनं ‘बचके रहना रे बाबा’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘शादी के साईड इफेक्ट्स’, ‘वेलकम’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं. सध्या मल्लिका शेरावत करण जोहर होस्ट करीत असलेल्या ‘द ट्रेटर्स २’ या ओटीटी रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे.
