Mamta Kulkarni on Ranaji new Song : १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करण अर्जुन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील ‘मुझको राणाजी माफ करना’ हे गाणं आजही ९० च्या दशकातील सुपरहिट गाण्यांपैकी एक मानलं जातं. ममता कुलकर्णी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आता तब्बल ३० वर्षांनंतर या गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे. राणाजी २.० हे नवीन गाणे रिलीज झाले असून हे नवीन व्हर्जन सोशल मीडियावर चर्चेमध्ये आलं आहे. या नवीन गाण्यावर ममता कुलकर्णींनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुझको राणाजी माफ करना” गाण्याच्या नवीन व्हर्जनमध्ये अभिनेत्री महिरा शर्मा झळकली आहे. महिराच्या अदा आणि नृत्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. हे नवीन वर्षे चर्चेमध्ये आलं असलं तरी जुनं गाणं आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये कायम लक्षात आहे. अलका याज्ञिक आणि इला अरुण यांच्या आवाजातील हे मूळ गाणं ममता कुलकर्णी यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्याच्या रिमेकवर त्यांनी प्रतिक्रिया देत महिराच्या नृत्याचे कौतुक केले आहे. पण, तरीही मूळ गाणं अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया ममता कुलकर्णींनी दिली आहे.

काय म्हणाल्या ममता कुलकर्णी?

‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ममता कुलकर्णी म्हणाल्या, “तिने (महिरा) खूप चांगलं काम केलं आहे. पूर्वी हे गाणं घागरा-चोली आणि भारतीय नृत्यशैलीत सादर करण्यात आलं होतं. आता ते वेस्टर्न पद्धतीनं आणि वेस्टर्न कपड्यांमध्ये सादर करण्यात आलं आहे, त्यामुळे ते जरा वेगळं वाटतं. पण, जुनं गाणं लोकांच्या मनात इतकं कोरलं गेलं आहे की ते लोकांना लगेच आठवतं.”

यावेळी ममता कुलकर्णींनी मूळ गाण्याच्या शूटिंगच्या आठवणीही सांगितल्या आहेत. त्या म्हणाल्या, “कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी या गाण्यासाठी दोन ते तीन दिवसांच्या रिहर्सलचं नियोजन केलं होतं. मात्र, मी पहिल्याच दिवशी सर्व स्टेप्स शिकून घेतल्या. तरीही शूटिंगच्या दिवशी पूर्ण कोरिओग्राफी बदलण्यात आली होती. यावर मी त्यांना विचारलं, ‘स्टेप्स का बदलल्या? मग रिहर्सलचा उपयोग काय झाला?’ पण चिन्नी प्रकाश मास्टर खूप हुशार होते आणि डान्स बदलूनही आम्ही दिलेल्या वेळेत गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं.”

ममता यांनी ‘करण अर्जुन’ सिनेमाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांचंही कौतुक केलं. त्या म्हणाली, “‘जय माँ काली’ हे गाणं शूट करणं खूप कठीण होतं, कारण त्यात अनेकजण नृत्य करणार होते. इतकी तगडी स्टारकास्ट आणि एवढी गुंतागूंत असलेला सिनेमा पूर्ण केल्याचं श्रेय मी राकेशजींना देते. ‘करण अर्जुन’ सुपरहिट ठरला. ‘जय माँ काली’, ‘भांगडा पा ले’ किंवा ‘एक मुंडा मेरी उम्र दा’… प्रत्येक गाण्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.”

याच मुलाखतीत ममता कुलकर्णी यांनी बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा काम करण्याबाबत मत मांडलं. त्या म्हणाली, “अजूनही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत, पण जर सिनेमाची गोष्ट चांगली असेल तरच पुन्हा एकदा अभिनय करण्याची माझी तयारी आहे. एखादी कथा मनापासून आवडली तर मी नक्की काम करेन. पण, ‘मुझको राणाजी माफ करना’सारखं गाणं आता करू शकणार नाही. कारण आता मी अध्यात्माशी जोडले गेले आहे आणि माझ्यात खूप बदल झाला आहे. आता नृत्यापेक्षा गाण्याच्या शब्दांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. त्या काळात मी फक्त गाण्याच्या स्टेप्सवर लक्ष दत होते. गाण्याचे शब्द काय आहेत, याचा मी कधी विचारच केला नव्हता, कारण तेव्हा मी लहान होते.”