Mandakini shares beautiful photos: ‘राम तेरी गंगा मैली’ हा सिनेमा १९८५ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमात मंदाकिनी, राजीव कपूर, दिव्या राणा, रझा मुराद असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. या सिनेमाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. अभिनेत्री मंदाकिनी यांना या सिनेमातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.
मंदाकिनी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडपासून, अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्या फार सक्रिय नाहीत. असे असले तरी त्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. त्या अनेक व्हिडीओ, फोटो आणि रील्स शेअर करत असतात. त्यावर चाहते कमेंट्स करत त्यांच्या फोटो, पोस्ट, व्हिडीओंवर दाद देतात.
‘राम तेरी गंगा मैली’मधील गंगाला पाहिलंत का?
नुकत्याच ६२ वर्षीय मंदाकिनी मनालीला गेल्या होत्या. तेथील काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. तिथे त्यांनी हिमाचली पारंपरिक कपडे परिधान केली होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट्स करत प्रेम व्यक्त केले आहे.
या ६१ वर्षीय अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना लिहिले, “पर्वतरांगांमध्ये एक विशेष आनंद असतो. पाइन वृक्षांची सळसळ, थंड वाऱ्याची झुळूक आणि निसर्गाच्या सौंदर्यामुळे मनाला शांती मिळते. मनालीमधील प्रत्येक सकाळ ही आशीर्वादासारखी वाटते. प्रत्येक रस्ता एक गोष्ट सांगतो. काही प्रवासामुळे फक्त आपण सुंदर ठिकाणी पोहोचत नाही, तर आपण स्वत:शीच जोडले जातो”, असे लिहित पुढे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
त्यांचे हे फोटो पाहून चाहत्यांना त्यांच्या राम तेरी गंगा मैलीमधील त्यांच्या लूकची आठवण आली आहे. अनेकांनी कमेंट्स करत तसे लिहिले आहे. तसेच, त्यांच्या निरागस दिसण्याचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी आजही तुम्ही आमच्यासाठी गंगा आहात असे लिहिले आहे.
दरम्यान, १९९६ पासून मंदाकिनी अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. सध्या त्या मुंबईत राहतात. त्या आता मुंबईत एक हर्बल सेंटर चालवतात आणि योगा शिकवतात.
