Mandana Karimi on cyber harassment: पडद्यावर दिसणारे कलाकार जितके अभिनयाच्या माध्यमातून, विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, तितकेच ते मुलाखती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या माध्यमातून ते त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे करतात.

आता अभिनेत्री मंदाना करीमीने नुकतेच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिला ऑनलाइन त्रास दिला जात असल्याचा खुलासा केला. ती भारतातून दुबईला स्थलांतरित झाली आहे, तरीही तिला त्रास दिला जात असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. ती नेमकं काय म्हणाली आहे याबद्दल जाणून घेऊ…

“सहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून मी सायबर छळ…”

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मंदाना म्हणाली, “मी सध्या सुट्टीवर आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं घडलं आहे. माझ्या घटस्फोटाला सहा वर्षे झाली. सहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून मी सायबर छळ आणि स्टॉकिंगला सामोरे जात आहे. एका अज्ञात अकाउंटवरून मी ज्यांच्याबरोबर काम करते त्या निर्मात्यांना, सहकलाकारांना माझ्याबद्दल गोष्टी सांगितल्या जातात; तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणीही केली जाते, हे अजूनही सुरूच आहे.”

“माझा इतका तिरस्कार कोण करत आहे?”

मंदाना पुढे म्हणाली, “मला हे समजत नाही की माझा इतका तिरस्कार कोण करत आहे? कोणाला असे वाटते की मला काम, पैसे, मित्र-मैत्रिणी मिळू नयेत. चार वर्षांपूर्वी मी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला होता. ही व्यक्ती नेमकी कोण आहे, हे शोधण्यासाठी मी एका व्यक्तीची मदत घेतली होती. तेव्हा मला सांगण्यात आले की, कोणीतरी एक जण प्रोफेशनल हॅकरला पैसे देऊन माझ्या सोशल मीडिया पोस्टवर बारकाईने नजर ठेवत आहे. मी प्रसिद्ध व्यक्तींच्या संपर्कात आले की त्यांना मीनाक्षी या नावाने ई-मेल पाठवला जातो. मी भारत सोडला आहे, पण माझ्या मित्र-मैत्रिणींना अजूनही असे ई-मेल येतात. मला ओळखणाऱ्या काही लोकांनीही मला हे ई-मेल पाठवले आहेत. हे एक खोटे अकाउंट आहे. भारतातील पोलिसांनाही या प्रकरणात काही करता आले नाही. कोणीतरी माझे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.”

मंदाना शेवटी म्हणाली, “आता खूप झालं, गेल्या अनेक वर्षांपासून मला सायबर छळ आणि स्टॉकिंगचा सामना करावा लागत आहे. ही अज्ञात व्यक्ती माझ्यावर बारकाईने नजर ठेवते. मी ज्या लोकांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करते किंवा ज्यांच्याशी माझा संबंध आहे, त्यांना त्रासदायक ई-मेल पाठवते. मी भारतातून दुबईला स्थलांतरित झाल्यानंतरही हे सुरूच आहे. याआधी मी सायबर क्राइम विभागाकडे अनेकदा तक्रारी दाखल केल्या आहेत. आता मी याबद्दल उघडपणे बोलत असून, त्यासंबंधीचे पुरावेही शेअर करत आहे. जर तुम्हाला माझ्याशी संबंधित कोणताही ई-मेल आला तर त्याला उत्तर देऊ नका, पैसे पाठवू नका किंवा त्यात जे लिहिले असेल त्यावर विश्वास ठेवू नका. त्या मेलचे स्क्रीनशॉट काढून मला पाठवा. हा छळ आहे आणि आता मी शांत बसणार नाही.”

‘बिग बॉस ९’मध्ये सहभागी झालेली मंदाना करीमी

मंदाना करीमीच्या कामाबद्दल बोलायचे तर ती इराणी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २०१० मध्ये विविध मॉडेलिंगमधून तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. २०१५ मध्ये रणबीर कपूरच्या ‘रॉय’ चित्रपटात तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. त्याच वर्षी ती ‘बिग बॉस ९’मध्ये सहभागी झाली होती. या पर्वाची ती सेकंड रनर-अप ठरली. याशिवाय ‘भाग जॉनी’, ‘मैं और चार्ल्स’ आणि ‘क्या कूल हैं हम ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ती महत्त्वाच्या भूमिकांत दिसली होती. २०२२ मध्ये ‘थार’ या सिनेमातही ती दिसली होती. २०१८ मध्ये ती ‘इश्कबाज’ या मालिकेत दिसली. २०२२ मध्ये ती ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

२०१७ मध्ये मंदानाने मुंबईतील उद्योजक गौरव गुप्ता यांच्याशी लग्नगाठ बांधली, २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.