‘रंग दे बसंती’, ‘रहना है तेरे दिल में’ आणि ‘तनु वेड्स मनु’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रोमँतिक हिरो आर. माधवन आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. इंटरनेटवर ‘मॅडी’ या नावाने कमालीची लोकप्रियता मिळवलेला हा अभिनेता खऱ्या आयुष्यातही एक आदर्श पती आहे. माधवन आणि त्याची मराठमोळी पत्नी सरिता बिरजे (Sarita Birje) यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. लग्नाला २७ वर्षे झाली असली, तरी आजही या जोडप्यामध्ये तेवढंच प्रेम आणि आदर पाहायला मिळतो. कोल्हापूरची सरिता आणि माधवन यांची पहिली भेट कशी झाली आणि एका साध्या डिनर डेटने कसं त्यांचं आयुष्य बदलून टाकलं, याबद्दल माधवनने अनेकदा मुलाखतींमध्ये खुलासे केले आहेत.
१९९१ मध्ये माधवन पहिल्यांदा सरिताला भेटला होता. सरिता तेव्हा एअर होस्टेस बनू इच्छित होती आणि कोल्हापुरात माधवनच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासला येत असे. माधवन तिचा शिक्षक असल्याने त्याने सुरुवातीला तिच्यापासून ठराविक अंतर राखले होते. मात्र, सरिताचा क्लास संपल्यावर ती एअर होस्टेस बनली आणि तिने आभार मानण्यासाठी माधवनला डिनरसाठी बोलावलं, तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीची खरी सुरुवात झाली.
‘आम्हाला एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे’
माधवनच्या मते नात्यात दोन्ही जोडीदार समान असायला हवे. आर. माधवनने अनेक मुलाखतींमध्ये सरितासोबतच्या आपल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. रणवीर अलाहाबादियाच्या एका पॉडकास्टमध्ये त्याने फिल्म इंडस्ट्रीत असूनही त्यांचे लग्न इतकी वर्षे कसे टिकून आहे, याचं गुपित सांगितलं होतं.
आमच्यातही भांडणं होतात, पण…
“इतर जोडप्यांप्रमाणेच आमच्यातही तितकीच भांडणं होतात. पण आमच्यात एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे. सरितासाठी मी कोणी मोठा नॅशनल स्टार किंवा अभिनेता नाही, की ज्यासाठी तिने माझी पत्नी असल्याचा अभिमान बाळगावा. ती तिच्या प्रेमात पडलेल्या मुलाची जोडीदार आहे. तो तिचा आदर करतो. त्याचबरोबर मी किती नशीबवान आहे, याची जाणीव तिला करून देण्याची मी एकही संधी सोडत नाही,” असं माधवनने सांगितलं.
८ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, माधवन व सरिताने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या ६ वर्षांनी, २००५ मध्ये त्यांचा मुलगा वेदांतचा जन्म झाला. वेदांत आता जलतरणपटू असून त्याने भारतासाठी अनेक पदकं जिंकली आहेत.
सरिता आणि माधवन यांनी एकत्र काम केलंय. होय, २००९ मधील ‘गुरू एन आलू’ या तमिळ रोमँटिक कॉमेडी चित्रपटासह माधवनच्या अनेक चित्रपटांसाठी सरिताने कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम केलंय. एका दुसऱ्या मुलाखतीत माधवनने दिग्दर्शक मणी रत्नम यांच्याकडून लग्नाविषयी मिळालेल्या एका सल्ल्याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतरच तो आपल्या पत्नीला शूटिंगला सोबत नेऊ लागला.
माधवन म्हणाला, “मणी रत्नम म्हणाले होते की, अनेक जोडपी गरज नसतानाही आपल्या नात्याची अतिशय कठीण परीक्षा घेतात. मला जाणवलं झाली की फिल्म इंडस्ट्रीत घरापासून दूर आउटडोअर शूटिंग दरम्यान सुंदर महिलांबरोबर काम करावं लागतं. त्यामुळे मी जिथे जाईल तिथे सरिताला सोबत नेऊ लागलो. यामुळे जेव्हा माझी अभिनेत्रींशी ओळख व्हायची, तेव्हा ती तिथेच असायची. आउटडोअर शेड्युल दरम्यान मला कधीच एकटेपणा जाणवला नाही. आणि जेव्हा सरिता मला पडद्यावर रोमँटिक सीन करताना पाहायची तेव्हा तिला माहित असायचं की यामागच्या भावना खऱ्या नाहीत.”
माधवनने त्यांच्या लग्नातील काही मजेशीर आणि एकमेकांना साथ देणारे किस्सेही शेअर केले आहेत. ‘अनफिल्टर्ड एंटरटेनमेंट’शी बोलताना आर. माधवन म्हणाला, “माझी पत्नी मला म्हणते की, तुला कामातून कधीच सुट्टी मिळणार नाही. तू तमिळ कॉमेडी, तमिळ ॲक्शन, ओटीटी (OTT), हिंदी ॲक्शन, इंग्लिश ओटीटी सगळं काही करतोस. तू घरी बसलायस याचंच मला आश्चर्य वाटतं. २०२० मध्ये कोविड दरम्यान, तिने मला घरातून बाहेर काढलं होतं आणि म्हटलं होतं, ‘बाहेर जा, काहीतरी काम कर आणि पैसे कमवून आण.'”
