१९९० ते २००० दरम्यान मनीषा कोईरालाचे अनेक सिनेमे गाजले. १९९५ ला प्रदर्शित झालेला बॉम्बे, १९९६ ला प्रदर्शित झालेला ‘खामोशी : द म्युझिकल’, १९९८ ला प्रदर्शित झालेला ‘दिल से’ तसेच २००२ ला प्रदर्शित झालेला ‘कंपनी’ या चित्रपटातून अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
त्याबरोबरच अभिनेत्री ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’, ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटांसाठीदेखील ओळखली जाते. तसेच, २०२४ ला प्रदर्शित झालेल्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमधून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या वेब सीरिजची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्या नात्याची झालेली चर्चा
मनीषा कोईराला यशाच्या शिखरावर असताना तिचे नाव जवळजवळ १२ जणांबरोबर जोडले गेले होते. ‘जनसत्ता’च्या एका रिपोर्टनुसार, उद्योजक सम्राट दहल यांच्याबरोबर लग्न करण्यापूर्वी अभिनेत्रीचे नाव विवेक मुश्रान, नाना पाटेकर, डी. ए. हुसैन, नायजेरियन उद्योगपती सेसिल अँथनी, आर्यन वैद, प्रशांत चौधरी व ऑस्ट्रेलियन राजदूत क्रिस्पिन कॉनरॉय यांच्याशी जोडले गेले होते. नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्या नात्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
दोन वर्षांत झालेला घटस्फोट
मनीषा कोईरालाने २०१० मध्ये उद्योगपती सम्राट दहल यांच्याशी लग्न केले. ते लग्न फार काळ टिकले नाही आणि २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा लग्न केले नाही.
एकापेक्षा एका चित्रपटांत काम केल्यानंतर मनीषा कोईरालाच्या करिअरला उतरती कळा लागली. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरू लागले. या सगळ्याला सामोरे जाण्यासाठी अभिनेत्रीने दारू व ड्रग्जचा आधार घेतला आणि त्याचा तिच्या कामावर परिणाम होऊ लागला. ती नेहमी नशेत असायची. या सगळ्या गोष्टींमुळे ती कामापासून दूर जाऊ लागली. पुढे तिला काम मिळण्याचे प्रमाण कमी झाले. जेव्हा दारू सोडण्याचा आणि आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याचा तिने विचार केला. त्या दरम्यान तिला कर्करोगाचे निदान झाले.
२०१२ मध्ये मनीषाची प्रकृती अचानक खूपच खालावली. उपचारासाठी दवाखान्यात गेल्यानंतर तिला गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर मनीषा कोईरालाने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले. जवळपास वर्षभराच्या उपचारानंतर तिने कर्करोगावर मात केली. कर्करोगातून बरी झाल्यानंतर मनीषा कोईरालाने ‘हील्ड : हाऊ कॅन्सर गेव्ह मी अ न्यू लाईफ’ हे पुस्तक लिहिले.
२०१७ मध्ये ‘डिअर माया’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर ती संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकमध्ये नर्गिस दत्तच्या भूमिकेत दिसली; पण तिला सर्वाधिक प्रसिद्धी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमुळे मिळाली.
