Manisha Koirala on Rekha: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांमध्ये मैत्री असते का, त्यांच्यात कशी नाती असतात याबद्दल कायमच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते. सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओ यांतून चाहते अंदाज करीत असतात. तसेच, कलाकार स्वत: विविध मुलाखतींमध्ये त्यांचे इंडस्ट्रीमध्ये कोण मित्र-मैत्रिणी आहेत, कोणाबरोबर कसे नाते आहे याबद्दल वेळोवेळी सांगत असतात.
अभिनेत्री मनीषा कोईराला मोक्ष, लाल बादशाह, मेहबुबा, अनोखा अंदाज, छुपा रुस्तम, लस्ट स्टोरीज, सनम, फर्स्ट लव्ह लेटर, महाराजा, कच्चे धागे, इंडियन, अग्निसाक्षी, बॉम्बे, दिल से, गुप्त: द हिडन ट्रूथ, मन, अकेले हम अकेले तुम अशा अनेक सिनेमांसाठी ओळखल्या जातात.
“तेव्हापासून आमची मैत्री…”
मनीषा कोईराला आजही विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या हीरामंडी या वेब सीरिजमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. आता मनीषा कोईराला त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
मनीषा कोईराला यांनी रेखा यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यांच्याबरोबर कशी मैत्री आहे, त्या व्यक्ती म्हणून कशा आहेत याबद्दल त्यांनी वक्तव्य केले होते. पिंकविलाला त्यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्या नेमकं काय म्हणाल्या होत्या, याबद्दल जाणून घेऊ…
अभिनेत्री म्हणालेल्या, “माझी व रेखाजींची मैत्री खूप उशिरा झाली. सुरुवातीला मी त्यांच्याशी फार मोकळेपणाने बोलायचे नाही. पण, मी जेव्हा त्यांची दुसरी बाजू बघितली आणि मोकळेपणानं बोलायला, वागायला सुरुवात केली. तेव्हाही त्यांनीही तसेच केले. त्यावेळी मला जाणवले की, त्या खूप हुशार आहेत. त्यांच्यात एक निरागस मुलगी दडलेली आहे. त्यांच्याकडे कला, बुद्धिमत्ता, करुणा आणि सौंदर्य, असं सगळंच आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व गूढ आहे. त्यांच्यासारखं कोणीच नाही. त्यांची प्रतिभा, सौंदर्य आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्वच अतुलनीय आहे.”
त्या असेही म्हणाल्या, “मी त्यांना मेकअपशिवायही पाहिले आहे. त्या खूप सुंदर दिसतात. आम्ही तासन् तास एकत्र बसून गप्पा मारल्या आहेत. मी फक्त त्यांचं बोलणं ऐकत होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि विचारांनी मी अक्षरशः भारावून गेले. त्यानंतर आम्ही काही कार्यक्रमही एकत्र केले आणि तेव्हापासून आमची मैत्री झाली.”
दरम्यान, रेखा यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यांचे विविध लूक कायमच लक्ष वेधून घेत असतात.
