Manisha Koirala on her loneliest night after cancer diagnosis: अभिनेत्री मनीषा कोईराला यांना २०१२ मध्ये गर्भाशयाच्या अंडाशयाचा चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचे (Stage IV Ovarian Cancer) निदान झाले होते. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले. एप्रिल २०१३ मध्ये त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनीषा कोईराला यांनी जेव्हा त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते, त्यावेळी त्यांना एकटेपणा वाटला होता, तसेच भीती वाटली होती, असे वक्तव्य केले आहे.

“मला खूप एकटेपणा…”

मनीषा कोईराला यांनी सुशांत प्रधान यांना नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी दवाखान्यात होते आणि मला कॅन्सर झाल्याचे सांगितले गेले. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी रात्र होती. मला खूप एकटेपणा वाटत होता. सगळीकडे अंधार दिसत होता. मला वाटत होते की, आता मी मरणार आहे. त्या क्षणी मला प्रचंड भीती वाटत होती आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वांत भयानक काळ होता.”

त्या म्हणाल्या, “अनेक वेळा मला एकटेपणाचा अनुभव आला आहे. मला कॅन्सर झाला तेव्हा जाणीव झाली की, एका रुग्णाला किती एकटे वाटते. तो काळ माझ्यासाठी अत्यंत भयानक आणि त्रासदायक होता. आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवतो आणि हेच आयुष्याचं सत्य आहे. काही वेळा या एकटेपणाबरोबर आपण राहायला शिकतो. आयुष्य हे वेगवेगळ्या पैलूंनी बनलेलं असतं. कधी कधी गर्दीत असूनही तुम्हाला एकटं वाटतं. मी जेव्हा काही बॉलीवूडच्या पार्ट्यांना जाते, तेव्हा तिथल्या लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करते; पण कधी कधी ते जमत नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणी हजर राहावंसं वाटतं; पण तरीही आतून एकटेपणा जाणवतो.”

कर्करोगाचं निदान झाल्यानंतर आयुष्यात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, याची जाणीव झाली, असेही मनीषा कोईराला म्हणाल्या. त्या म्हणाल्या, “मला आयुष्यानं दुसरी संधी दिली. त्यामुळे जे काही अनावश्यक होतं, ते सगळं मी बाजूला केलं. तुमच्या अस्तित्वाचा पाया तुमच्या मूल्यांशी जुळत नाही, अशा सगळ्या गोष्टी मी बाजूला केल्या.”

मनीषा असेही म्हणाल्या, “पूर्वी माझ्याबरोबर मित्रांचा मोठा ग्रुप आणि बरंच मोठं सर्कल असायचं. आता मला माझ्या आयुष्यात खूप लोक नको आहेत. आयुष्यात कमी, पण अर्थपूर्ण लोकांचा सहवास हवा आहे. माझ्या कुटुंबातील लोक एकमेकांशी घट्ट जोडलेले असावेत, असं मला वाटतं. मी माझ्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नव्हते; पण मला दुसरी संधी मिळाली आहे आणि त्यामुळे आता माझ्या आरोग्याला प्राधान्य देईन. माझ्या आयुष्यात आता चार-पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला काही मोजके, पण चांगले आणि जवळचे मित्र हवे आहेत. मला निसर्गासाठी वेळ द्यायचा आहे. मला आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे, प्रत्येक क्षण मनापासून जगायचा आहे आणि आपण जिवंत आहोत, याबद्दल कृतज्ञ राहायचं आहे”, असे म्हणत मनीषा यांनी कशाला प्राधान्य देणार याबद्दलची माहिती दिली.

दरम्यान, मनीषा कोईराला यांनी सुभाष घई यांच्या सौदागर या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अकेले हम अकेले तुम, १९४२ : लव्ह स्टोरी, खामोशी : द म्युझिकल, अग्निसाक्षी, गुप्त अशा अनेक सिनेमांत काम करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.