अलीकडच्या काळात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. सामान्य नागरिकांपासून ते मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनाही या गंभीर आजाराचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री मनीषा कोईराला हिलासुद्धा कर्करोगाचं निदान झालं होतं. एकदा तिने त्या कठीण काळातील भीती, निराशा आणि अनुभव मनमोकळेपणाने सांगितलं.
मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कर्करोगावर मात करत इंडस्ट्रीत पुन्हा त्यांचं दमदार कमबॅक केलं. यामध्ये सोनाली बेंद्रे, महेश मांजरेकर, हिना खान अशा अनेकांचा समावेश आहे. अलीकडेच अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनीही त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं अशी माहिती शेअर केली. अशातच बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिनेसुद्धा तिला अंडाशयाचा कर्करोग (Ovarian cancer) झाल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे.
मनीषा कोईरालाने सांगितला वेदनादायी अनुभव
मनीषा कोईरालाने याबद्दल एएनआयशी संवाद साधताना सांगितलेलं. ती म्हणालेली, “न्यूयॉर्कमध्ये ज्या डॉक्टरांची भेट घेतली, त्यांनी माझा कर्करोग बरा होऊ शकतो, असा विश्वास दिला. त्यामुळे मला मोठा दिलासा मिळाला, पण मनात भीती कायम होती. तो काळ खूप वेदनादायी होता. मात्र, त्या अनुभवातून माझ्यातील एक वेगळीच बाजू समोर आली.”
मनीषाने पुढे सांगितलेलं की, “आता मी प्रत्येक गोष्टीकडे कृतज्ञतेने, नव्या आशेने आणि सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. आयुष्याबद्दल जो निष्काळजीपणा माझ्यात आला होता, तो पूर्णपणे नाहीसा झाला. माझ्यावर तब्बल ११ तास शस्त्रक्रिया झाली. माझ्या डॉक्टरांनी माझ्या आई-वडिलांनाही खूप धीर दिला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्यानंतर केमोथेरपीलाही यशस्वी प्रतिसाद मिळाला. अनेकदा मी खचून जायचे. त्या काळात मला फक्त निराशा, वेदना आणि भीतीच दिसायची. पण हळूहळू माझी प्रकृती सुधारू लागली.”
मनीषाने या गंभीर आजारावर मात करत पुन्हा मनोरंजनविश्वात कमबॅक केलं. २०२४मध्ये आलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ या लोकप्रिय सीरिजमधील तिच्या कामाचं विशेष कौतुक झालं. तिने यामधून अनेकांचं लक्ष वेधलं. तसंच ही सीरिजसुद्धा हिट ठरली.
